अवयवरूपी क्राऊन परिधान करत डॉक्टर सौंदर्यवतींची अवयवदान जागृती

अवयवरूपी क्राऊन परिधान करत डॉक्टर सौंदर्यवतींची अवयवदान जागृती

पुणे : डोळे, हृदय, किडनी, फुफुसे, त्वचा, आतडे, स्वादुपिंड अशा आकारातील क्राऊन डोक्यावर घालत डॉक्टर असलेल्या सौंदर्यवतींनी वॉक केला. शरीराने आपण मेलो, तरी आपण अवयवरूपी जगावे, असा संदेश या डॉक्टरांनी दिला. डॉ. प्रचिती पुंडे (किडनी), डॉ. मुग्धा बर्वे (हृदय), डॉ. अंजली आवटे (फुफुसे), डॉ. योगिता रोहकले (डोळे), डॉ. कीर्ती जळकोटे (त्वचा), डॉ. रोहिणी (स्वादुपिंड) आणि डॉ. सुप्रिया वायगावकर (आतडे) यांनी वॉक करत त्या त्या अवयवाबाबत जनजागृती केली.

निमित्त होते, जागतिक अवयवदान दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज, ब्युटीफुल मॅगझीन व नेहा जोशी फाउंडेशनच्या वतीने आयोजित जनजागृती कार्यक्रमाचे. दान करता येणारे, प्रत्यारोपण होऊ शकणारे अवयव, दान आणि प्रत्यारोपण प्रक्रिया याविषयी जनजागृती करण्यात आली. अवयवदानाचा संकल्प यावेळी करण्यात आला. गौरी शिकारपूर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. प्रसंगी सहायक पोलीस आयुक्त नीलम जाधव, रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजच्या अध्यक्षा डॉ. सिमरन जेठवानी, नेहा जोशी फाउंडेशनचे संस्थापक राहुल जोशी, ‘रोटरी’च्या प्रकल्प प्रमुख निसरीन पुनावाला आदी उपस्थित होते.

गौरी शिकारपूर म्हणाल्या, “अवयवदानाबाबत अजूनही लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे अशा स्वरूपाचे जागृतीपर कार्यक्रम घेणे महत्वाचे आहे. अवयवदान करून आपण अनेकाना एक नवे आयुष्य देऊ शकतो.” रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजच्या माध्यमातून वर्षभर अवयवदान करण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असून, लोकांना अवयवदानाची प्रोत्साहित केले जाणार असल्याचे डॉ. सिमरन जेठवानी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *