भोरमधील नसरापूर हादरलं! चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या

भोरमधील नसरापूर हादरलं! चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेल्या अमानुष घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ गावात कडकडीत बंद पाळण्यात आला असून ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत.

ग्रामस्थांनी आरोपीला तात्काळ कठोरात कठोर शिक्षा, विशेषतः फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. “आरोपीला आमच्या हवाली करा,” अशी संतप्त प्रतिक्रिया देत नागरिकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. महिलांमध्येही प्रचंड संताप दिसून आला. “मुलींची सुरक्षा जर सरकार देऊ शकत नसेल, तर ‘लाडकी बहीण’ योजनेचा काय उपयोग?” असा सवाल महिलांनी उपस्थित केला.

६५ वर्षीय आरोपीने “वासरू दाखवतो” असे सांगून चिमुकलीचा हात धरत तिला गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केली. इतकेच नव्हे, तर मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

ही मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजीकडे आली होती. दुपारच्या सुमारास ती दिसेनाशी झाल्यानंतर कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर गोठ्यात तिचा मृतदेह आढळून आला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी मुलीला त्या दिशेने घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.

ही घटना केवळ एका कुटुंबावर आलेले दु:ख नसून, समाजाच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी जोर धरत आहे.