पुणे : दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज् असोसिएशनच्या (डीएसटीए) नुकत्याच पार पडलेल्या ७१ व्या वार्षिक अधिवेशनात हिंदुस्थान अँटीबायोटिक्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक यशवंत घारपुरे यांना ‘डीएसटीए’ विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे माजी गृह व अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला (The Deccan sugar Technologies association DSTA felicitate Engineer yashwant Gharpure by hands of formar home minister Jayant Patil).
सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जेडब्ल्यू मॅरियटमध्ये येथे हा कार्यक्रम पार पडला. उद्योग, तंत्रज्ञान व व्यवस्थापन क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल यशवंत घारपुरे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमावेळी माजी मंत्री राजेश टोपे व दिलीप देशमुख, राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, माजी आयएएस अधिकारी डॉ. शेखर गायकवाड, कर्नाटकचे माजी मंत्री श्रीमंत पाटील, ‘डीएसटीए’चे अध्यक्ष सोहन शिरगावकर आदी उपस्थित होते.
यशवंत घारपुरे हे ‘डीएसटीए’सह गेल्या सात दशकांपासून विविध क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी रिसर्च आणि डेव्हलपमेंट संशोधक, शिफ्ट इंजिनिअर, सिनियर केमिकल इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर, जनरल मॅनेजर अशा विविध पदांवर काम केलेले आहे. याबरोबरच घारपुरे यांनी विविध विषयांवर ३०० लेख लिहीले आहेत. याशिवाय त्यांच्या व्हॉलेंटरी एक्सिक्युटीव्ह फोरम ऑफ इंडिया आणि सर्व्हीसेस ऑफ रिटायर्ड एक्सिक्युटीव्ह अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असोसिएशन अशा दोन स्वयंसेवी संस्था आहेत.
केमिकल इंजिनिअरींगच्या क्षेत्रात घारपुरे यांनी भरीव काम केले असून, त्यांनी अनेक जागतिक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. त्यांच्या या कार्याचा इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअर्स, पुणे शाखा आणि राष्ट्रीय स्तरावरुन विशेष गौरव करण्यात आला आहे. तसेच लक्ष्मीनारायण इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नालॉजी यांच्याकडून यशस्वी माजी विद्यार्थी म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
