पुणे : “शिक्षणानेच भविष्य घडू शकते, यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. मात्र, त्यासाठी आपल्याला योग्यवेळी योग्य संधीही मिळायला हवी. शिक्षणाला नवतंत्रज्ञान, कौशल्य, जिद्द, उद्यमशीलता आणि योग्य संधीची जोड मिळाली, तर आपले भविष्य निश्चितच उज्ज्वल असू शकते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हायला हवा, अशी अपेक्षा उद्योजक व देणगीदार प्रतापराव पवार यांनी व्यक्त केली (Dr. Raghunath Mashelkar inaugurated skills and entrepreneurship development at the Vidyarthi Sahayak Samiti).
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या सेनापती बापट रस्त्यानजीक असलेल्या लतिका गायतोंडे मुलींच्या वसतिगृहात ‘पद्मश्री प्रतापराव पवार कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रा’चे उद्घाटन डॉ. माशेलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांच्यासह विश्वस्त, कार्यकर्ता, सल्लागार, माजी विद्यार्थी मंडळ सदस्य व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतापराव पवार यांच्या पुढाकारातून आणि अर्थिक योगदानातून येथे एआय प्रशिक्षण, रोबोटीक्स लॅब, परदेशी भाषा वर्ग सुरु करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना पारंपरिक अभ्यासासोबतच कौशल्य विकास करण्यासाठी हे केंद्र नक्कीच उपयुक्त ठरु शकते. विशेष म्हणजे या प्रशिक्षणाचा लाभ पहिल्यांदाच समितीतील विद्यार्थांबरोबरच इतर विद्यार्थ्यांनाही घेता येणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले.

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, “भारताच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतानाच भारताच्या भविष्याचा उत्सव आपण सगळे साजरा करत आहोत. प्रतापराव यांचे कार्य मोठे असून, त्यांचे नेतृत्व सचोटी आणि सतत समाजाच्या हिताचा विचार करणारे आहे. कितीही दबाव असला तरी निर्णय हा मूल्यांवर आधारित असायला हवा, ही प्रतापरावांची भूमिका जवळून अनुभवली आहे. ‘मी’मधून पद, ‘आपण’मधून संस्था आणि ‘आपण सारे’ या भावनेतून राष्ट्र निर्माण होते. प्रतापराव ‘आपण सारे’च्या भावनेतून काम करणारे आहेत. विद्यार्थी साहाय्यक समिती हे वसतिगृह नव्हे, तर परिवर्तनाचे केंद्र आहे. इथे केवळ राहण्यासाठी खोली दिली जात नाही, तर आयुष्याच्या यशाची खोली मापण्याची संधी मिळते. केवळ शिक्षण नाही, तर कौशल्ये आणि आत्मविश्वास देणारी ही संस्था आहे.”
यावेळी अभिनेता-दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी प्रतापराव पवार यांची मुलाखत घेतली. प्रतापराव पवार म्हणाले, “आई-वडिलांनी केलेले संस्कार आणि समाजासाठी योगदान देण्याची दिलेली शिकवण यामुळे आज इथपर्यंत पोहोचू शकलो. पालकांनी मुलांना लहानपणापासून योग्य ते संस्कार घरातून द्यायला हवेत. त्यातूनच नवीन पिढी उत्तम माणूस म्हणून तयार होणार आहे. परदेशात विविध परिषदांमध्ये सहभागी होत असताना चीनसारख्या देशात वर्षापासून ‘एआय’ वापरत आहोत, तर भारतात का नाही असा विचार माझ्या मनात आला. पण राजकीय दृष्टी, आर्थिक पाठबळ आणि योग्य शिक्षण नसेल तर एआय सारख्या तंत्रज्ञानाचा काही उपयोग होणार नाही. येत्या काळात इतर देशांसोबत पुढे जायचे असेल तर एआयसारख्या तंत्रज्ञानाला पर्याय नाही.”
विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन, हुशार व गरजू मुलांना संस्थेत प्रवेश देऊन शैक्षणिक संधी दिली जाते. तसेच केवळ निवास-भोजनाची सुविधा पुरविण्यावरच समाधान न मानता व्यक्तिमत्व विकासाचे मोठे कार्य समिती गेल्या ६२ वर्षांपासून करीत आहे. बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनाही कौशल्याधारित शिक्षण मिळावे या हेतून या केंद्राची स्थापना करण्यात आल्याचे तुषार रंजनकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
डिजिटेक इंडियातर्फे विद्यार्थ्यांनी काढलेले तैलचित्र देऊन पवार आणि डॉ. माशेलकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी समितीला वेळोवेळी मदत करणाऱ्या गजानन पाटील, संतोष करंजे, डिजिटेकचे अजित गटे, गिरीश देसाई, सचिन ईटकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. माजी विद्यार्थिनी व पुणे महापालिका सहायक आयुक्त सुरेखा भणगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. समितीचे खजिनदार संजय अमृते यांनी आभार मानले.
