पुणे लोकसभेसाठी पुण्यातल्या बड्या उद्योगपतीनेही कसली कंबर

पुणे लोकसभेसाठी पुण्यातल्या बड्या उद्योगपतीनेही कसली कंबर

वाढता वाढता वाढे… हनुमानाची शेपटी अन पुणे लोकसभेसाठी इच्छुकांची यादी… असेच काहीसे चित्र पुण्यात पाहायला मिळतेय. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी नशीब आजमावायला अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने शक्तिप्रदर्शन करत आहे. आता पुण्यातून लोकसभा लढवण्याची संधी द्यावी, अशी मागणी करत पुण्यातील एका बड्या उद्योगपतीने कंबर कसली आहे.

भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुकांची रांग लागल्याचे आपण गेल्या काही दिवसांपासून पाहत आहोत. अगदी आजच राज्यसभेची उमेदवारी गळ्यात पडलेल्या माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यासह माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, ईशान्य भारतात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर, छगन भुजबळ यांच्याशी दोन हात करणारे शिवाजी माधवराव मानकर, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी खासदार संजय काकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव पुणे लोकसभा मतदारसंघासाठी चर्चिले गेले. आता यामध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे, ती म्हणजे देशाचे नेते शरद पवार व केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे निकटवर्तीय उद्योगपती अनिरुद्ध देशपांडे यांच्या नावाची!


सर्वच राजकीय पक्षांमध्ये उठबस असलेल्या, शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या, पण संघाशी संबंधित असलेल्या अनिरुद्ध देशपांडे यांना पुणे लोकसभेसाठी भाजपकडून तिकीट मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एकेकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या व सध्या देशाचे संरक्षण मंत्री असलेल्या राजनाथ सिंह यांच्या गोटातील व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य असलेले अनिरुद्ध देशपांडे हे नाव आहे. अनेक राजकीय पुढार्‍यांना वेळोवेळी मदत करणाऱ्या अनिरुद्ध देशपांडे यांच्याकडे पुण्याच्या विकासाचे खास मॉडेल आहे. ते पुण्यातील सिटी कॉर्पोरेशन या मोठ्या बांधकाम व्यवसायाचे प्रमुख आहेत. पुणेच नाही तर महाराष्ट्रातील शहरीकरणाचा एक आदर्श नमुना असलेल्या अमनोरा पार्क टाऊन या विशेष प्रकल्पाचे ते प्रमोटर आहेत. यासह देशात सर्वाधिक गाजलेल्या लवासा प्रकल्पाचे ते प्रमोटर आहेत.

पुण्याच्या चहूबाजूला विस्तारलेल्या सिटी कॉर्पोरेशनचे प्रमुख असलेले अनिरुद्ध देशपांडे एक उत्तम बांधकाम व्यावसायिक, कलात्मक दृष्टी असलेले विकसक व पुणे शहराच्या विकासासाठी खास दूरदृष्टीकोन असलेले व्यक्तिमत्व आहे. काही वर्षांपूर्वी देशपांडे यांनी पुण्याच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर केला होता. पुण्यातील प्रसिद्ध पु ल देशपांडे उद्यान निर्माण करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. असा हा दूरदृष्टी असलेला, पुण्याच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ शकणारा नेता पुण्याला मिळाला, तर पुण्याचे भविष्य उज्वल होऊ शकते, असे त्यांचे समर्थक म्हणतात.

असेही सांगितले जाते की, २०१४ मध्येच अनिरुद्ध देशपांडे पुण्याचे खासदार झाले असते. तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी अनिरुद्ध देशपांडे यांच्या नावाला संमती दर्शवली होती व त्यांनाच पुणे लोकसभेचे तिकीट द्यायचे होते. मात्र महाराष्ट्रातील तेव्हाचे भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी हट्टाने अनिल शिरोळे यांना भाजपकडून उमेदवारी द्यायला लावली आणि अनिरुद्ध देशपांडे यांचे खासदारकीचे स्वप्न अपुरे राहिले. पुढे २०१९ ला गिरीश बापट यांनी पुणे लोकसभेची निवडणूक लढवली. त्यामुळे पुन्हा एकदा अनिरुद्ध देशपांडे यांना लोकसभा निवडणुकीत नशीब अजमावण्याची संधी मिळता मिळता राहिली. 

गेल्या दहा वर्षात पुण्याचा खासदार शहराला न्याय देऊ शकलेला नाही. पुण्याचे अनेक प्रश्न, समस्या सोडवू शकणारा नेता पुण्याला मिळाला नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी अनिरुद्ध देशपांडे यांच्यासारखा सक्षम दूरदृष्टी असणारा, धोरणात्मक निर्णय घेऊ शकणारा, विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारा सर्वसमावेशक चेहरा पुण्याचा खासदार व्हायला हवा, अशी अपेक्षा पुण्याच्या विविध भागातून व्यक्त होत आहे. सुरेश कलमाडी यांच्यानंतर कायमच पुण्यात नेतृत्वाचा अभाव दिसून आला आहे. ही पोकळी भरून काढण्याची क्षमता अनिरुद्ध देशपांडे यांच्याकडे असल्याचे बोलले जात असून, केंद्रीय स्तरावरही त्यांचे नाव जोर धरू लागले आहे.

आगामी काळात भाजपने देशपांडे यांना उमेदवारी दिल्यास संभाव्य जातीय समीकरणे बाजूला पडतील व विकासासाठी काम करणारा एक चेहरा देऊन भाजप वेगळेपण सिद्ध करेल, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे. इच्छुकांची गर्दी तर फार मोठी आहे. पण यात बाजी कोण मारणार हे आत्ता सांगणे अवघड आहे. पुण्यात लोकसभा निवडणूक लढवताना ब्राह्मण समाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचाही विचार करावा लागतो. त्यामुळे याला अनुकूल असे नाव भाजपला द्यावे लागणार आहे. याचा देखील विचार केल्यास देवधर किंवा अनिरुद्ध देशपांडे यांच्या नावाला प्राधान्य दिले जाईल, अशी शक्यता आहे.

1 thought on “पुणे लोकसभेसाठी पुण्यातल्या बड्या उद्योगपतीनेही कसली कंबर

  1. अनिरुद्ध देशपांडे नावाजलेले उद्योजक असले तरी सर्वसामान्य जनमत तयार करण्यात अजून तितकेसे यशस्वी ठरलेले नाहीत. पुण्याच्या एका टोकाला माजी अध्यक्ष जगदीश मुळीक तर एका टोकाला माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव बर्यापैकी चर्चेत आहे. त्यात मुळीक यांनी विविध उपक्रमांतून आपले नाव रुजवायच्या प्रयत्नात आघाडी घेतली आहे तसा प्रयत्न ईशान्य भारतात लक्षवेधी काम केलेले प्रामाणिक कार्यकर्ते सुनील देवधर यांनीही चालवला आहे. त्यात माजी खासदार संजय काकडे, प्रकाश जावडेकर, अगदी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाव फक्त चर्चेत आहे. त्यामुळे भाजपा लोकसभा उमेदवारीसाठी तुर्तास मुळीक, देवधर आणि मोहोळ आघाडीवर आहेत. शेवटी कार्याबरोबरच जातीचा मुद्दाही प्रामुख्याने लक्षात घेतल्या जातो. सगळ्यात शेवटी दिल्लीत काहीही ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *