पुणे, ता. २ : “ऑटोमेशनच्या युगात करसल्लागारांची भूमिका केवळ रिटर्न फायलिंगपुरती मर्यादित राहिलेली नाही. आधुनिक काळात करसल्लागारांनी धोरणात्मक समुपदेशन आणि मूल्यवर्धित सेवा याकडे वाटचाल करणे अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन राज्य वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाचे माजी अतिरिक्त आयुक्त धनंजय आखाडे यांनी केले.
महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एमटीपीए) च्या ४६ व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. शिवाजी रस्त्यावरील एमटीपीए सभागृहात आयोजित या कार्यक्रमास वर्धापनदिन सोहळा समितीचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र सोनावणे, एमटीपीएचे अध्यक्ष ॲड. अनुरुद्र चव्हाण, जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे प्रमुख ॲड. पार्थ बधेका, तसेच ज्येष्ठ कर सल्लागार ॲड. अशोक संघवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
धनंजय आखाडे पुढे म्हणाले की, “तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे कर क्षेत्रात नवी आव्हाने निर्माण होत आहेत. केवळ कायद्याचे ज्ञान पुरेसे नाही, तर न्यायालयीन निर्णय, विश्लेषणाच्या नव्या पद्धती आणि प्रशासनातील बदल समजून घेणे आवश्यक आहे. ई-फायलिंगमुळे पारदर्शकता वाढली असून, प्रणाली अधिक ऑटोमेटेड झाली आहे. जीएसटी लवाद (जीएसटीएटी) प्रक्रियाही सुरू होत आहे. त्यामुळे करसल्लागारांनी स्वतःला अधिक सक्षम करून सल्लागाराच्या भूमिकेत बदल घडवणे काळाची गरज आहे.”
या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. नवनीतलाल बोरा, मनोज चितळीकर, विनोद राहते यांना ‘एमटीपीए कोहिनूर’, सीए ईशान पाटकर यांना ‘एमटीपीए जीएसटी आयकॉन’, सीएमए श्रीपाद बेदरकर व सीएमए हर्षद देशपांडे यांना ‘एमटीपीए स्पेशल अचिव्हमेंट’, नंदकुमार निऱ्हाली, सीए सचिन गांधी, ॲड. विनोद म्हस्के यांना ‘एमटीपीए बेस्ट फ्रेंड’, ॲड. निखिल देशमुख व सीए सारिश हेंद्रे यांना ‘एमटीपीए रायझिंग स्टार’, तसेच ॲड. दत्तात्रय सावंत, ॲड. कमलेश नागर, सीए अक्षय मोदी, ॲड. राजेश जागे यांना ‘एमटीपीए स्टार ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
ॲड. नरेंद्र सोनावणे म्हणाले, “एमटीपीएचा वर्धापनदिन हा केवळ वर्षपूर्तीचा सोहळा नसून, आपल्या सर्वांच्या एकात्मतेचा आणि कुटुंबभावनेचा उत्सव आहे. प्रत्येक सदस्याच्या संघर्ष, समर्पण आणि निष्ठेचा हा गौरव आहे. आपण केवळ व्यावसायिक नसून देशाच्या आर्थिक प्रगतीचे मूक शिल्पकार आहोत, या जाणिवेतून काम केले पाहिजे.”
ॲड. अनुरुद्र चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “संघटनेची सदस्यसंख्या २६०० पेक्षा अधिक झाली असून, सीए, वकील, करसल्लागार आणि सीएमए अशा विविध क्षेत्रातील व्यावसायिकांचा त्यात समावेश आहे. संघटनेची व्याप्ती राज्याबरोबरच देशभर वाढत आहे, ही अभिमानाची बाब आहे.”
ॲड. पार्थ बधेका यांनी संस्थात्मक निर्णयांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “संस्थेची उद्दिष्टे सामूहिक असतात आणि कालानुरूप त्यात लवचिकता आवश्यक असते. निर्णयांचे फायदे तात्काळ दिसत नसले तरी दीर्घकालीन असतात.”
ॲड. अशोक संघवी यांनी करदाते आणि कायदा यांच्यातील दुवा म्हणून आपली भूमिका महत्त्वाची आहे. नवीन आयकर कायदा आणि जीएसटीएटी ही आगामी आव्हाने असून, सतत शिकण्याची वृत्ती जपणे आवश्यक आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रणव सेठ यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. ज्ञानेश्वर नरवडे यांनी मानले. मिलिंद हेंद्रे, सुभाष घोडके, सीए अजय शर्मा, सौरभ शहा, विजय उणेचा, अश्विनी जाधव व नेहा नाणेकर यांनी सोहळ्याचे यशस्वी संयोजन केले.
