पुणे : बाणेर येथील युरोकूल-कुलकर्णी युरो सर्जरी इन्स्टिट्यूट येथे उभारण्यात आलेल्या पहिल्या रोबोटिक युरोलॉजी सेंटरचे उद्घाटन केंद्र्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. दिवंगत दत्तात्रय पी. म्हैसकर यांच्या स्मरणार्थ हे रोबोटिक सेंटर उभारण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी (ता. १५) दुपारी १२.३० वाजता युरोकूल युरोलॉजी इन्स्टिट्यूट, बिटवाईज टेरा टॉवरजवळ, मुंबई-बंगळुरू महामार्ग, बाणेर पुणे येथे हा उद्घाटन सोहळा होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सौ. सुधा म्हैसकर, युरोकूलचे संचालक डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत.

युरोलॉजी’ व ‘नेफ्फरोलॅाजी’साठी समर्पित १०५ बेडचे ‘युरोकुल’ भारतातील तिसरे मानांकित हॉस्पिटल आहे. मूत्रमार्गाच्या विकारांवरील अद्ययावत व सुसज्ज सेवा एकाच छताखाली २४ तास उपलब्ध आहेत. रुग्णांवर परवडणाऱ्या किंमतीत शस्त्रक्रिया, तसेच बिल भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णाला परत पाठवले जात नाही, हे येथील वैशिष्ट्य आहे. या सामाजिक बांधिलकीमुळे देश-विदेशातील रुग्णांमध्ये ‘युरोकुल’ आपलेसे झाले आहे. जगातील सुमारे ५० देशांमध्ये जाऊन प्रात्यक्षिकांसह ‘युरेथ्रोप्लास्टी’ शस्त्रक्रिया करणारे डॉ. संजय कुलकर्णी ‘युरोकुल’चे प्रमुख आहेत, असे हॉस्पिटलच्या वतीने कळवण्यात आले आहे.