प्रामाणिक, सेवाभावी व चांगल्या कामाची समाज दखल घेतो

प्रामाणिक, सेवाभावी व चांगल्या कामाची समाज दखल घेतो

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे प्रतिपादन; पांडुरंग देवालय ट्रस्टतर्फे आदर्श माता पुरस्कारांचे वितरण

पुणे : “समाजात चांगले वागणाऱ्यांना नेहमीच विविध अडथळ्यांना समोरे जावे लागते; पण न डगमगता मनापासून केलेल्या प्रामाणिक, सेवाभावी व चांगल्या कामाची दखल समाजात घेतली जाते,” असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले.

बाणेर येथील पांडुरंग देवालय ट्रस्ट आणि श्री भैरवनाथ शिक्षण संस्था यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह समाप्ती व पार्वतीबाई धोंडिबा धनकुडे आदर्श माता पुरस्कार वितरण प्रसंगी कुलकर्णी बोलत होत्या. प्रसंगी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता राजेंद्र पवार, परिवहन महामंडळ लेखानिरीक्षक प्रमोद भोसले,  श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक शिवलाल उर्फ नाना धनकुडे, अध्यक्षा सुरेखा धनकुडे, सचिव विराज धनकुडे, खजिनदार राहुल धनकुडे, महेश महाराज हरवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या २३ वर्षांपासून दिला जाणारा ‘पार्वतीबाई धोंडिबा धनकुडे आदर्श माता पुरस्कार’ यंदा लक्ष्मीबाई विष्णू कळमकर, ताराबाई दत्तात्रेय शिंदे, चंद्रभागा सावळाराम गायकवाड, वैजयंता जालिंदर बालवडकर, बायडाबाई ज्ञानोबा धनकुडे यांना प्रदान करण्यात आला.
 

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “मुलांना योग्य संस्कार देऊन त्यांचे भविष्य घडवणे हे पालकांचे काम आहे. खूप मेहनत, काबाडकष्ट करून आई-वडील मुलांना शिक्षण आणि चांगले संस्कार देण्यासाठी झटतात. त्यांच्या त्यागाचा, बलिदानाचा विसर पडता कामा नये. प्रत्येक स्त्रियांच्या कर्तृत्वाची एक कहाणी असते. त्याचा सन्मान करणे हीच आपली खरी संस्कृती आहे.”

शरद गोसावी म्हणाले, “ज्ञानाबरोबरच मुलांना चांगले संस्कार मिळावेत, यासाठी आईवडील कायमच कटिबद्ध असतात. मुलांनी आई-वडिलांचा, ज्येष्ठांचा सन्मान केला पाहिजे. माता-पिता व गुरूंचे स्मरण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यांचे संस्कार ही आपल्या आयुष्याची खरी संपत्ती आहे.”

 
राजेंद्र पवार म्हणाले, “आपल्या जडणघडणीत आई-वडिलांचे, शिक्षकांचे योगदान मोठे असते. त्याची जाणीव ठेवून आपण एक चांगला माणूस व्हावे. सामाजिक भान जपत दुसऱ्यांची दुःखे दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावे.” ह.भ.प. महेश महाराज हरवणे  यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. शिवलाल धनकुडे यांनी प्रास्ताविकात पुरस्काराविषयी भावना व्यक्त केली. सूत्रसंचालन शशिकांत जाधव यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *