झाडे जगवण्यावर अधिक भर हवा : डॉ. माधव गाडगीळ

झाडे जगवण्यावर अधिक भर हवा : डॉ. माधव गाडगीळ

मएसो बालशिक्षण मंदिर शाळेच्या शताब्दीनिमित्त माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व धान्य संकलन

पुणे : “माझ्यावेळी होती तशीच शाळा आजही आहे. फक्त आता आजूबाजूला फार इमारती आणि वर्दळ झाली आहे. तेंव्हा सगळीकडे फार झाडी होती. हल्ली सगळीकडेच वेगवेगळ्या कारणांनी झाडे तोडली जातात. नुसते ‘झाडे लावा, झाडे लावा’ म्हणून सांगितले जाते. पण तीच लावलेली झाडे पुन्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने तोडतात. त्यामुळे नुसते झाडे लावणे महत्वाचे नाही, तर लावलेली झाडे जगवणे तेवढेच गरजेचे आहे,” असे मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भांडारकर रस्त्यावरील बालशिक्षण मंदिर शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित १९८५ ते १९९२ या काळातील माजी विद्यार्थी मेळाव्यात डॉ. गाडगीळ बोलत होते. डॉ. गाडगीळ हेही १९४८-४९ च्या बॅचचे माजी विद्यार्थी आहेत. प्रसंगी शाला समिती अध्यक्षा आनंदी पाटील, महामात्र सुधीर भोसले, मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, शिशुशाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी फाळके उपस्थित होते. काही विद्यार्थी त्यावेळी असलेला गणवेश परिधान करून आले होते. राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा म्हणून एक साथ नमस्ते करत गाणी, गोष्टी ऐकत तब्बल २५-३० वर्षांनंतर विद्यार्थी आपल्या त्याच शिक्षकांसमवेत शाळेचा दिवस जगले. जुन्या आठवणींना नुसता शब्दांनी नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवाने उजाळा देत माजी विद्यार्थी स्नेहमेळावा रंगला.

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये दंत चिकित्सक डॉ. भक्ती दातार, उद्योजक परिक्षीत देवल, अदिती आठल्ये, मनीषा बापट, दर्शन महाजन, तुषार बोरोटिकर, मृणाल भिडे आदी उपस्थित होते. त्यांना त्यांच्याच काळातील शिक्षकांनी आज कविता व गोष्टी शिकविल्या. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका मेधा शिंत्रे, वासंती औटी, सरिता भाटवडेकर, जयश्री बोरगावकर सहभागी झाल्या होत्या. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी गाणी, कविता, नाट्यछटा, समूहगीत सादर केले. तसेच त्यांनी एक मुष्ठी धान्य हा उपक्रम राबवत जमा झालेले तूरडाळ, तांदूळ, साखर हे धान्य डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते ‘वनवासी कल्याण आश्रमाच्या’ तुषारिका लिमये, कुमुदिनी कुलकर्णी, नीला घुबे यांच्याकडे सुपूर्द केले.

भाऊसाहेब बडधे म्हणाले, “शाळेच्या शताब्दी महोत्सवासाठी विद्यार्थ्यांनी खूप काम केले आहे. आजूबाजूच्या १०० शाळांना १०० दंतपेटी देण्यात आल्या, १०० शाळांच्या शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा घेतली असून, त्यात १३४ शिक्षक सहभागी झाले होते. ऑनलाईन कठपुतळ्यांचा कार्यक्रम, ऑनलाईन व्याख्याने घेण्यात आली. जनसेवा फाऊंडेशनच्या पानशेत येथील वृद्धाश्रमात भेट देऊन तेथील वृद्धांना आर्थिक मदत करण्यात आली.”

“१९६८ च्या विद्यार्थ्यांनी शाळेत अत्याधुनिक सुविधांसह १५ संगणकाचा संगणक कक्ष उभारला. माजी विद्यार्थिनी व प्रसिध्द नृत्यांगना पंडिता मनीषा साठे यांनी केलेल्या नृत्यार्पण या कार्यक्रमातून मिळालेल्या निधीतून, तसेच माजी विद्यार्थी व मएसो संस्था यांच्या मदतीने शाळेसाठी सुसज्ज मैदान तयार झाले आहे,” असेही बडधे यांनी सांगितले. शाळेच्या शिक्षिका मनीषा कदम व माजी विद्यार्थी दर्शन महाजन यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.