वनराज आंदेकर खून प्रकरणाशी कनेक्शनची चर्चा; पाच गोळ्या झाडून हल्लेखोर फरार, पुण्यात गँगवॉर पुन्हा चर्चेत

वनराज आंदेकर खून प्रकरणाशी कनेक्शनची चर्चा; पाच गोळ्या झाडून हल्लेखोर फरार, पुण्यात गँगवॉर पुन्हा चर्चेत

पुणे (प्रतिनिधी : पायल पोटभरे) : पुणे शहरात पुन्हा एकदा गँगवॉरची दहशत पाहायला मिळाली. पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजी कॉर्नर परिसरात आज सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास अक्षय उर्फ बाळा मस्के (वय २६) याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भरदिवसा गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळा मस्केवर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

माहितीनुसार, बाळा मस्के हा व्यवसायाने रिक्षाचालक असून तो सकाळी बालाजी कॉर्नर परिसरात आला असताना चार ते पाच जणांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी जवळून अंदाजे चार ते पाच गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोळीबारानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाळा मस्केला नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले.

या घटनेनंतर जुन्या वैमनस्यातून आणि गँगवॉरमधून हा हल्ला झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. जखमी बाळा मस्के हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी आकाश मस्केचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या गोळीबाराचा संबंध सूडाच्या राजकारणाशी जोडला जात आहे.

वनराज आंदेकर खून प्रकरणानंतर पुण्यातील गुन्हेगारी विश्वात तणाव वाढला होता. बदला घेण्याच्या उद्देशाने काही जण टार्गेटवर असल्याच्या चर्चा सुरू असतानाच हा हल्ला घडल्याने शहरातील गँगवॉर पुन्हा सक्रिय झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बाळा मस्के हा आंबेगाव पठार परिसरात पत्नी आणि मुलीसोबत राहत होता. मागील काही दिवसांपासून काही जण आपला पाठलाग करत असल्याची शंका त्याला होती. त्यामुळे त्याने रात्री उशिरा बाहेर फिरणे टाळले होते. मात्र, सकाळच्या वेळीच झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकेही सक्रिय करण्यात आली आहेत. पुण्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.