निरोगी, आनंदी जीवनासाठी वर्तमानात जगण्याची आवश्यकता

निरोगी, आनंदी जीवनासाठी वर्तमानात जगण्याची आवश्यकता

डॉ. जगदीश हिरेमठ यांचे मत; जागतिक हास्य दिनानिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे विशेष कार्यक्रम

पुणे : “विनोद वर्तमानात घडत असतो आणि तो वर्तमानात कळून हास्य फुलत असते. त्यामुळे एखाद्या विनोदावर तुम्ही हसलात म्हणजे वर्तमानात जगलात. वर्तमानात जगलात की, भूतकाळातील दुःख आणि भविष्यातील चिंता याऐवजी वर्तमानातील आनंद अनुभवता येतो. त्यामुळे स्वास्थ्य देखील सुदृढ राहते, ” असे मत प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी व्यक्त केले.

जागतिक हास्यदिनाच्या (मे महिन्यातील पहिला रविवार) निमित्ताने नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे शनिवारी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हास्ययोग प्रात्यक्षिके, तसेच प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांचे ‘ज्येष्ठांचे आरोग्य व हास्ययोग’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते.जागतिक हास्य दिन ११० देशात साजरा होत आहे.

प्रसंगी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, अभिनेते विजय पटवर्धन, दत्ता बहिरट, संदीप खर्डेकर, मंजुश्री खर्डेकर, अमोल रावेतकर, ऍड. पांडुरंग थोरवे, प्रकाश धोका, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, सचिव पोपटलाल शिंगवी, उपाध्यक्ष विजय भोसले व सहकारी आदी उपस्थित होते. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे बालगंधर्व रंगमंदिर हास्यमय झाले होते.

डॉ. जगदीश हिरेमठ म्हणाले, “मुलांचे हास्य सगळ्यात निरागस असते. प्रत्येकाने आपला प्रौढपणाचा सदरा बाजूला करून आतले मूल जागे केले, तर ती निरागसता आपल्यातही येऊ शकते. प्रत्येक माणसाने मनाने कायमच ‘ॲक्टीव’ राहणे गरजेचे आहे. तुम्ही जेवढे ‘ॲक्टीव’ तेवढेच आनंदी राहतात व स्वस्थ ही राहतात.” यावेळी डॉ. हिरेमठ यांनी विनोदाचे विविध प्रकार, त्याची मेंदूत होणारी प्रक्रिया याचीही माहिती दिली.

“वर्तमानात जगलात तरच खरे हसू शकतात. हुशारी हीच प्रत्येक विनोदाचा गाभा असतो. विनोद करण्यासाठी खूप चिंतन, मनन आणि खूप ऐकण्याची सवय हवी असते. विविध गोष्टींची निरक्षण करणे आवश्यक असते. दुःख, तणाव आजूबाजूला कायम असतातच, पण आपण आपली वृत्ती आनंदी ठेवली तर दृष्टिकोन आपोआप बदलतात. उगाच फार विचार करत बसण्यापेक्षा वर्तमान कृती करणे गरजेचे असते,” असे त्यांनी अनेक विनोदी उदाहरणासह पटवून दिले.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “मन शरीर सुदृढ करण्यासाठी लावलेले हे रोपटे आता २५ वर्षांनी मोठे झाले आहे. आता हसरे पुणे व्हायला वेळ लागणार नाही. या हास्यक्लबद्वारे पुणेकर हसतो आणि जगाला हसायला लावतो हे सिद्ध झाले आहे. हे सर्वांचे सामूहिक यश आहे. कोरोनाच्या संकट काळात नवचैतन्य परिवाराच्या हास्य योगामुळे अनेकांना तणावमुक्त राहण्यास मदत झाली आहे.”

२५ वर्षे हास्ययोग प्रसार करणारे मकरंद टिल्लू म्हणाले, “पुण्यातील पहिल्या हास्यक्लबची स्थापना विठ्ठल व सुमन काटे यांनी १९९७ मध्ये केली. या चळवळीचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असून, नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या २०५ शाखांमधून २० हजारहून अधिक सदस्यांनी या आरोग्य चळवळीचा लाभ घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात सुरु झालेल्या संस्थेच्या ‘हसायदान’ या ऑनलाईन शाखेचा लाभ देशातील व परदेशातील तब्बल पाच हजार सदस्य घेत आहेत. आता विविध कंपन्या, पोलीस, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हास्ययोग प्रशिक्षण घेऊन सकारात्मकता निर्माण करत आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published.