पुणे : देशातील बेरोजगारी, न्यायव्यवस्था आणि सोशल मीडियावरील अभिव्यक्ती यावरून नव्या वादाला तोंड फुटले असून, ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नावाची व्यंगात्मक डिजिटल चळवळ सध्या देशभर चर्चेत आली आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका सुनावणीदरम्यान केलेल्या वक्तव्यावरून हा वाद निर्माण झाला. त्यांच्या टिप्पणीविरोधात सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला आणि त्यातूनच या मोहिमेची सुरुवात झाली.
विशेष म्हणजे, सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच या चळवळीला मोठा प्रतिसाद मिळाला. माहितीनुसार, २० लाखांहून अधिक लोकांनी या मोहिमेशी जोडले गेल्याचा दावा केला जात आहे. इंस्टाग्रामवर या पेजचे लाखो फॉलोअर्स वाढले असून, एक्स (X) वरही मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. अधिकृत राजकीय पक्ष म्हणून नोंदणी नसतानाही सोशल मीडियावर या मोहिमेचा प्रभाव वाढताना दिसत आहे.
वादाची सुरुवात १५ मे रोजी झालेल्या एका न्यायालयीन सुनावणीतून झाली. यावेळी सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी काही बेरोजगार तरुणांविषयी भाष्य करताना, “काही लोक झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ले करतात,” अशा आशयाचे वक्तव्य केल्याचे सांगितले जाते. तसेच काहीजण माध्यमं, सोशल मीडिया किंवा माहिती अधिकार कार्यकर्ते बनून संस्थांवर टीका करतात, असेही त्यांनी नमूद केले होते. या वक्तव्यावर अनेकांनी तीव्र आक्षेप घेतला.
दरम्यान, वाढत्या टीकेनंतर सरन्यायाधीशांनी आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यानंतरही सोशल मीडियावर या विषयाची चर्चा कायम असून, ‘कॉक्रोच जनता पार्टी’ हा ट्रेंड सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
