पुणे: अंध, अपंग व मूकबधिर भगिनींचे लक्ष्मीपूजन करून दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट आणि वंदे मातरम् संघटनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वंदे मातरम् संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे, पुणे शहर कार्याध्यक्ष संतोष देवकर, अंध अपंग वेल्फेअरच्या अध्यक्षा पल्लवी भालशंकर आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी संघटनेचे किरण केकाने, आदित्य मुंगळे, गिरीश धुमाळ, तुषार गिरी, ओम जामगे, सुरज केकाने यांनी केले.
सचिन जामगे म्हणाले, “दिवाळीचा सण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करतात. अंध, अपंग व मूकबधिर भगिनींना सणाचा आनंद मिळावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लक्ष्मीस्वरूप माता-भगिनींचे पूजन करून त्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. त्यांच्याबरोबर दिवाळीचा सण साजरा करताना आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आनंद वाटतो.”