पुणे: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश दिले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी शुक्ला यांच्या बदलीची मागणी सातत्याने लावून धरली होती. या मागणीची दखल घेत सोमवार दि. ४ रोजी अखेर आयोगाने शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिले, हे काँग्रेसचे यश आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी व्यक्त केले.
रोहन सुरवसे-पाटील म्हणाले, “गेल्या अनेक दिवसांपासून शुक्ला यांच्या भाजपधार्जिण्या वागण्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे आम्ही करत होतो. आज या तक्रारीची दखल घेत आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वरिष्ठ आयपीएस केडरमधील अधिकाऱ्याची तात्काळ महासंचालक म्हणून नियुक्ती करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.”
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यापूर्वी आढावा बैठका आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेदरम्यान अधिकाऱ्यांना केवळ निष्पक्ष राहून त्यांची कर्तव्ये पार पाडताना त्यांच्या वर्तनात पक्षपाती नसावा, असा इशारा दिला होता. मात्र, शुक्ला यांच्याकडून अजूनही आमचे फोन टॅप होत आहेत, अशी तक्रार काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती, असेही सुरवसे-पाटील म्हणाले.