अमेरिकेत कर्करोगावरील जागतिक परिषदेत पुण्याच्या संशोधनावर मोहोर; डॉ. योगेश बेंडाळे यांची माहिती

अमेरिकेत कर्करोगावरील जागतिक परिषदेत पुण्याच्या संशोधनावर मोहोर; डॉ. योगेश बेंडाळे यांची माहिती

पुणे: स्वादुपिंडाचा कर्करोग (पॅनक्रिॲटिक कॅन्सर) हा वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत आव्हानात्मक आजार मानला जातो. मात्र, अशा प्रगत अवस्थेतील रुग्णांसाठी पुण्यातील ‘रसायू कॅन्सर क्लिनिक’ने विकसित केलेली ‘आयुर्वेद रसायना थेरपी’ (एआरटी) आशेचा नवा किरण ठरली आहे. अमेरिकेतील सॅनदिएगो येथे नुकत्याच झालेल्या अमेरिकन असोसिएशन फॉर कॅन्सर रिसर्च (एएसीआर) या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित वार्षिक परिषदेत या संशोधनाचे सादरीकरण झाले. जागतिक संशोधकांनी याची दखल घेत ही थेरपी प्रभावी असल्याचे नमूद केले आहे.
 
पुण्याच्या रसायू कॅन्सर क्लिनिकमधील डॉ. योगेश बेंडाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अशा १७ रुग्णांवर आयुर्वेद रसायन थेरपी पद्धतीने उपचार केले. हे महत्त्वपूर्ण संशोधन १६.६ इम्पॅक्ट फॅक्टर असलेल्या ‘कॅन्सर रिसर्च’ या जगप्रसिद्ध नियतकालिकातही प्रसिद्ध झाले आहे. डॉ. योगेश बेंडाळे यांनी या संशोधनाविषयी माहिती दिली. या संशोधनात रसायू कॅन्सर क्लिनिकमधील डॉ. पूनम बिरारी-गवांदे, डॉ. प्रियंका शिरोळे आणि डॉ. अविनाश कदम यांचा सहभाग आहे.
 
डॉ. बेंडाळे म्हणाले, “स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान अनेकदा शेवटच्या टप्प्यात होते. अशावेळी शस्त्रक्रिया किंवा केमोथेरपी अथवा इतर कोणतीही परिणामकारक चिकित्सा बहुतेक रुग्णांना उपलब्ध नसते. साधारणपणे पसरलेल्या प्रगत स्वादुपिंडाच्या कर्करोगात रुग्णाचे आयुर्मान तीन ते सहा महिने समजले जाते. मात्र, रसायन थेरपी घेणाऱ्या रुग्णांमध्ये हे आयुर्मान सरासरी १० ते ११ महिन्यांपर्यंत वाढल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. त्यांचे केवळ आयुर्मानच वाढले नाही, तर जगण्याचा दर्जाही उंचावला. भूक लागायला लागली व आहार वाढला.
 
आज जगभरात पाश्चात्य वैद्यकशास्त्र आणि इतर वैद्यके यांच्यात इंटिग्रेटिव्ह ऑंकोलॉजी अशा स्वरूपात एक प्रकारचा समन्वय असल्याचे निदर्शनास येते. भारतामध्ये मात्र पाश्चात्य वैद्यक आणि आयुर्वेद चिकित्सक यांच्यात समन्वय साधून ‘इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी’वर अधिकाधिक भर देण्याची गरज असल्याचे सातत्याने दिसत आहे. रुग्ण हिताचा विचार करून कोणत्याही एका विचाराचा अट्टाहास न करता विशाल दृष्टीने इंटिग्रेटिव्ह ऑंकोलॉजी याकडे पाहण्याची गरज निश्चित आहे. या दृष्टीने या संशोधनाचे महत्त्व अधोरेखित होते.
——————————
“आयुर्वेद रसायन थेरपी ही रुग्णांच्या शारीरिक क्षमतेत वाढ करून कर्करोगाशी लढण्याची ताकद देते. प्रगत स्वादुपिंडाच्या कर्करोगात जिथे उपचारांच्या मर्यादा येतात, तिथे ही पद्धत रुग्णांना सन्मानाने जगण्याची आणि आयुर्मान वाढवण्याची संधी देते. पुण्यातील या संशोधनामुळे जागतिक स्तरावर आयुर्वेदिक कर्करोग उपचारांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होणार आहे.”
– डॉ. योगेश बेंडाळे, प्रमुख संशोधक, रसायू कॅन्सर क्लिनिक
——————————
संशोधनातील महत्त्वाचे मुद्दे:
– अमेरिकेतील सॅनदिएगो येथील ‘एएसीआर २०२६’ परिषदेत ३० हजारांहून अधिक तज्ज्ञांसमोर सादर
– केमोथेरपी किंवा शस्त्रक्रिया किंवा इतर कोणत्याही चिकित्सेस पात्र नसणाऱ्या रुग्णांसाठी उपयुक्त
– ⁠केवळ आयुर्वेदीय रसायन चिकित्सेमुळे रुग्णाचे आयुष्यमान वाढल्याचे अत्यंत महत्वपूर्ण संशोधन.
– ⁠केवळ रसायनाने सुमारे १२ टक्के रुग्णांमध्ये कॅन्सरची गाठ कमी झाल्याचे महत्वपूर्ण निरीक्षण
– रुग्णाला भूक लागणे, अशक्तपणा व इतर तक्रारी कमी होण्यास मदत झाली
– दैनंदिन कामात उत्साह व जीवन शैलीत लक्षणीय सुधारणा.