अशोक खिलारी लिखित ‘मराठा दौलतीचे खांब’ पुस्तकाचे प्रकाशन

अशोक खिलारी लिखित ‘मराठा दौलतीचे खांब’ पुस्तकाचे प्रकाशन

मराठा साम्राज्याच्या शिलेदारांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा : सुनील रेडेकर

पुणे : मराठा साम्राज्याच्या उभारणीसाठी अनेक वीरांनी आपले रक्त सांडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्यात योगदान दिलेल्या सवंगडी, सेनानी, सरदार यांच्यापासून ते पेशवाई पर्यंतच्या शिलेदारांच्या लेखाजोखा ‘मराठा दौलतीचे खांब’ पुस्तकात मांडला आहे. दोनशे वर्षांचा हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा,” असे प्रतिपादन पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्याने पुणे विद्यार्थी गृह प्रकाशित व मुंबई अग्निशमन दलातील प्रमुख अग्निशामक अशोक बाजीराव खिलारी लिखित, ‘मराठा दौलतीचे खांब’ पुस्तकाचे प्रकाशन रेडेकर यांच्या हस्ते झाले. पुणे विद्यार्थी गृह संस्थेत झालेल्या या कार्यक्रमावेळी संस्थेचे कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे, माजी कार्याध्यक्ष प्राचार्य हणमंत भोसले, संचालक कृष्णाजी कुलकर्णी, रमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

प्रा. राजेंद्र कांबळे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द, त्यांचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असा तीन पिढ्यांचा इतिहास यामध्ये लिहिला आहे. प्रत्येक शिलेदाराला न्याय देण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. स्वराज्याच्या उभारणीत योगदान देणाऱ्या शिलेदारांचा इतिहास सर्वांनी जाणून घेतला पाहिजे.”

अशोक खिलारी म्हणाले, “मराठा साम्राज्याचा विस्तार करण्याचे काम ज्या सेनापतींनी, सरदारांनी केले, अशा ४५ लोकांच्या कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. या पुढील काळात आणखीन काही शिलेदारांच्या गाथा मांडण्याचा मानस आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *