डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत  शशिकांत कांबळे यांचा शिवसेनेत प्रवेश

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शशिकांत कांबळे यांचा शिवसेनेत प्रवेश

पुणे: पद्मा फाउंडेशनचे संस्थापक शशिकांत कांबळे यांनी नवी दिल्ली येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेना पक्षाचे संसदीय गटनेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शशिकांत कांबळे जनहिताचे काम करतील, असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला (Shashikant Kamble Shivsena Entry in presence Dr Shreekant Shinde).

सामाजिक, पर्यावरणीय तसेच जनहिताच्या विविध विषयांवर पद्मा फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक व्यापक स्तरावर काम करण्याची गरज असल्याची भावना श्री. शशिकांत कांबळे यांनी यावेळी व्यक्त केली. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक व जनहिताच्या विविध उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

“समाजसेवेचा अनुभव आणि जनतेशी असलेला थेट संपर्क याचा उपयोग करून सर्वसामान्य नागरिक, युवक, महिला तसेच पर्यावरणाशी संबंधित प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनहितासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे,” असे शशिकांत कांबळे यांनी सांगितले.