पुणे: पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. मात्र, पोलिसांच्या कुटुंबीयांना सोबत घेऊन कुटुंबातील भावनिक संवाद, एकात्मता आणि सकारात्मक वातावरण वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आलेले ‘फिट फोर्स’ हे प्रशिक्षण अनोखे ठरले. लोहमार्ग पोलिस आयुक्त एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुण्यातील त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनच्या संकल्पनेतून हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. घाटकोपर येथील रेल्वे कॉलनीतील नवरंग हॉलमध्ये लोहमार्ग पोलिस आयुक्तालयातील पुरुष व महिला पोलिस अमलदार तसेच त्यांच्या पती-पत्नींसाठी झालेल्या या दोन दिवसीय प्रशिक्षणात ५० जोडप्यांनी सहभाग घेतला.
पोलिसांच्या अनियमित ड्युट्या, अचानक येणारी कामाची जबाबदारी, सण-उत्सवाच्या वेळी कर्तव्यावर राहणे आणि मुलांना व कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता न येणे यामुळे कुटुंबात नकळत मानसिक दुरावा निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन कुटुंबातील संवाद वाढविणे, भावनिक नाते दृढ करणे आणि आनंदी वातावरण निर्माण करणे हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. माजी अतिरिक्त मुख्य सचिव उज्वल उके यांनी एक दिवसीय ‘माहोपेक्षा’ प्रशिक्षण दिले. व्यक्तिमत्त्व विकास व वर्तणूक प्रशिक्षणावर प्रशांत वाघमारे, तर भावनिक संवाद व एकात्मतेवर प्रज्ञा वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. लोहमार्ग पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारीही या वेळी उपस्थित होते.
या उपक्रमासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज. बा. तांबोळी यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत संभाजी धाईंजे, श्रेणी पीएसआय शीतल साप्ते, महिला पोलिस हवालदार रीया सावंत आणि सहाय्यक पोलिस फौजदार सुदेश गोलतकर यांनी मानवी संसाधन शाखेच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले. प्रशिक्षणाच्या समारोपावेळी अनेक पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी भावनिक अनुभव व्यक्त केले. कुटुंबातील छोटे-छोटे संवादही नात्यांमध्ये मोठी जवळीक निर्माण करू शकतात, याची जाणीव या प्रशिक्षणातून झाल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिस आयुक्तांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा विचार करून असा उपक्रम आयोजित केल्याबद्दल प्रशिक्षणार्थींनी समाधान व्यक्त केले. प्रशिक्षणपूर्तीनंतर सहायक पोलीस आयुक्त सुधाकर शिरसाठ यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
