विश्वबंधुता परिवारातर्फे दोन जूनला होणार विश्वबंधुतेचा जागर

विश्वबंधुता परिवारातर्फे दोन जूनला होणार विश्वबंधुतेचा जागर

पुणे: विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त विश्वबंधुता परिवारातील सहयोगी संस्थांच्या वतीने विश्वबंधुता दिन, रोकडे यांचे अभिष्टचिंतन, ‘विश्वधर्म बंधुता’ ग्रंथाचे प्रकाशन, काव्य संमेलन आणि पुरस्कार वितरण अशा पंचरंगी उपक्रमाचे आयोजन केले आहे. मंगळवार, दि. २ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समितीच्या अध्यक्षा प्रा. भारती जाधव व प्रकाशक मंदाकिनी रोकडे यांनी दिली.
 
ज्येष्ठ कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास ऍड. प्रार्थना सदावर्ते, डॉ. वसंत बुगडे, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, डॉ. अशोककुमार पगारिया. कादंबरीकार प्रा. शंकर आथरे आणि कवयित्री संगीता झिंजुरके यांची विशेष उपस्थिती राहील. काव्यसंमेलनामध्ये महाराष्ट्रातील २५ नामवंत कवी सहभागी होतील. प्रसंगी १२ साहित्यिकांना ‘विश्वबंधुता प्रकाशदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या हडपसर येथील जयवंत पब्लिक स्कुलमधील विद्यार्थी व शिक्षक यांचा विशेष सहभाग असणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. शरयू पवार, डॉ. बंडोपंत कांबळे, डॉ. सविता पाटील, सीमा गांधी, विद्या अटक, प्रा. प्रशांत रोकडे, तुकाराम कांबळे, प्रा. सायली गोसावी आणि सुनील बोरसे यांनी विशेष पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले.