महाराष्ट्रातील स्मार्ट शेतीच्या विकासाला मिळणार ‘बूस्टर’

महाराष्ट्रातील स्मार्ट शेतीच्या विकासाला मिळणार ‘बूस्टर’

दावोसमधील सामंजस्य करारांतर्गत पुण्यातील न्यूट्रीफ्रेश फार्म्सला ९० कोटींची परदेशी गुंतवणूक प्राप्त

पुणे, ता. २०: महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अमेरिकेतील इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (यूएसआयडीएफसी) संस्थेकडून ९० कोटींची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र शासन, रूरल एन्हान्सर्स आणि न्यूट्रीफ्रेश फार्म्स यांच्यात नियंत्रित वातावरणातील शेती यासाठी नुकताच २५०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला होता. त्यातील ४०० कोटी रुपयांची गुंवणूक अमेरिकेतून येणार होती आणि त्यापैकी ही ९० कोटींची पहिली गुंतवणूक आली आहे. त्यातून पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर आणि नागपूर येथे प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत, अशी माहिती रूरल एन्हान्सर्सचे संस्थापक व सीईओ अंबर आयदे यांनी सांगितली. या गुंतवणुकीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीकोनाला ठोस जागतिक मान्यता मिळाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जागतिक स्तरावर तणाव आणि अनिश्चिततेचे वातावरण असतानाही महाराष्ट्रातील कृषी व अन्नसुरक्षा क्षेत्रावर जागतिक गुंतवणूकदारांकडून विश्वास दाखवला जात असल्याचे हे प्रतीक आहे. स्मार्ट शेतीसाठी झालेल्या सामंजस्य करारानंतर महाराष्ट्राला मिळालेली ही पहिली थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आहे. या निधीद्वारे अत्याधुनिक कृषी पायाभूत सुविधा उभारणी, तंत्रज्ञान-आधारित शेती प्रणालींचा विस्तार आणि निर्यात-केंद्रित कृषी पुरवठा साखळी बळकट करण्यात येणार आहे. यामुळे महाराष्ट्र उच्च कार्यक्षमतेच्या आणि तंत्रज्ञानाधारित शेतीसाठी जागतिक केंद्र म्हणून उदयास येईल. यासह उत्पादनक्षमता, पाणी वापर कार्यक्षमता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्र आता हवामान-प्रतिरोधक कृषी आणि अन्न प्रणाली क्षेत्रातील जागतिक गुंतवणुकीसाठी अग्रक्रमाचे राज्य म्हणून अधिक बळकट होईल, असे अंबर आयदे यांनी सांगितले.

रूरल एन्हान्सर्सच्या पुढाकारातून अमेरिकेच्या डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनकडून पहिला हप्ता जमा

न्यूट्रीफ्रेश फार्म्सचे सहसंस्थापक गणेश निकम म्हणाले, या भांडवली गुंतवणुकीमुळे नियंत्रित वातावरणीय शेती (सीईए) पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे. यामुळे अचूक तंत्रज्ञानाधारित शेती, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि पिकांच्या उत्पादनक्षमतेत वाढ साध्य होईल. तसेच, या उपक्रमाद्वारे निर्यातक्षम कृषी पुरवठा साखळी अधिक बळकट करण्याचे उद्दिष्ट असून, राज्याला उच्च कार्यक्षमतेच्या शेतीचे केंद्र म्हणून विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

न्यूट्रिफ्रेश फार्म्सचे सह-संस्थापक संकेत मेहता यांनी सांगितले की, रूरल एन्हान्सर्स ग्रुपचे अंबर आयदे यांच्या नेतृत्वाखालील भागीदारीमुळे प्रत्यक्ष पातळीवर प्रभावी परिणाम दिसून येतील. येत्या काही महिन्यांत महाराष्ट्राला या उपक्रमाचे ठोस परिणाम अनुभवायला मिळतील. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लावण्यासोबतच शाश्वत कृषी पद्धतींना चालना देईल.

 


 

‘डीएफसी’ची ही गुंतवणूक आमच्या दावोस येथील वचनबद्धतेचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करण्याच्या दिशेने पडलेले महत्वाचे पाऊल आहे. अशा भागीदारींच्या माध्यमातून आम्ही अचूक शेतीकडे होणारा बदल अधिक वेगाने घडवून आणत आहोत, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवत आहोत आणि जागतिक अन्न प्रणालीत महाराष्ट्राची भूमिका अधिक मजबूत करत आहोत.”
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

————————–

मुख्य ठळक मुद्दे
– अमेरिकेतील ‘डीएफसी’कडून न्यूट्रीफ्रेश फार्ममध्ये ५०० कोटींची गुंतवणूक
– एकूण गुंतवणुकीपैकी ९० कोटींचा पहिला हप्ता प्राप्त
– दावोसमधील सामंजस्य करारानंतर पहिलीच परदेशी गुंतवणूक
– नियंत्रित पर्यावरणाधारित क्लस्टर शेतीवर भर
– निर्यात-केंद्रित कृषी पायाभूत सुविधांना चालना
– जुलै २०२६ मध्ये प्रकल्प कार्यान्वित होणार