पुणे: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित ‘भारताची प्रतिभा’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या सोमवारी (ता. २० एप्रिल) सकाळी ११ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा रंगणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी व सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
यावेळी महिला उद्यम ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. पुस्तक प्रकाशनासह महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा हा समारंभ ठरणार आहे. या पुस्तकाची निर्मिती प्रतिभाताई पाटील यांच्या कन्या ज्योती राठोर यांनी केली आहे. संकल्पना ऍड. प्रताप परदेशी, तर संपादन ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जेनवाल यांनी केले आहे. या प्रकाशन समारंभास नागरिक, साहित्यप्रेमी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामगौरव प्रकाशनाच्या वतीने भाग्यश्री ठाकरे यांनी केले आहे.
