डॉ. अजय तावरे व सहकार्‍यांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई करून शासकीय सेवेतून निलंबित करा

डॉ. अजय तावरे व सहकार्‍यांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई करून शासकीय सेवेतून निलंबित करा

वंदेमातरम संघटनेचे अध्यक्ष सचिन जामगे यांची मागणी; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

पुणे : कल्याणीनगर परिसरात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात गाडीखाली चिरडून मृत्युमुखी पडलेल्या युवक आणि युवतीला न्याय मिळेल का? असा प्रश्न युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट संयुक्त वंदेमातरम संघटनेचे अध्यक्ष सचिन शिवाजीराव जामगे यांनी निर्माण केला आहे. ससूनमधील डॉ. अजय तावरे आणि त्याच्या साथीदारांनी आरोपीच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बिल्डर विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल सहित डॉक्टरकी पेशाला काळिमा फासणारा डॉ. अजय तावरे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर मोकाअंतर्गत कारवाई करून शासकीय सेवेतून कायमचे निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘उषःकाल होता होता, कालरात्र झाली, पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवा मशाली’, असे म्हणण्याची वेळ सध्या पुणेकरांवर आली आहे. पुण्यात पोर्शे कार अपघातानंतर अग्रवाल कुटुंबीय आपल्या अल्पवयीन आरोपी बाळाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी पब, पोलीस, ड्रायव्हर यांच्यावरती दबाव टाकून पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर ससूनमधील डॉ. अजय तावरे व त्याचे साथीदार यांनी आरोपीचे  ब्लड सॅम्पल कचऱ्यात फेकून दुसऱ्याच व्यक्तीचे ब्लड सॅम्पल नमुने घेतले. डॉ. अजय तावरे याने डॉक्टरकी पेशाला काळिमा फासली असून, अशा मुजोर डॉक्टरवर आणि त्याच्या सहकाऱ्यांसहित बिल्डर विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई व्हावी. तसेच आमदार सुनिल टिंगरे यांची निपक्षपाती चौकशी करावी, अशी वंदे मातरम् संघटनेची मागणी आहे.

कोर्टाबाहेर बिल्डर विशाल अग्रवालवरती फक्त काळी शाई फेकली. डॉ. तावरेच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. अजय तावरे ससून रूग्णालयातील किडनी रॅकेट, तसेच ललित पाटील ड्रग्ज प्रकरणीही संशयित आरोपी आहे. याला व याच्या सर्व साथीदारांना शासकीय सेवेतून आठ दिवसांत कायमस्वरूपी निलंबित करावे. अन्यथा वंदे मातरम् संघटना तीव्र आंदोलन करेल. याची सर्व जबाबदारी पुणे शहर पोलीस, महाराष्ट्र राज्य सरकार, गृहमंत्री राज्य, पालकमंत्री पुणे यांची असेल, असा इशारा सचिन शिवाजीराव जामगे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *