फॅशन डिझाईन क्षेत्राच्या सखोल ज्ञानासाठी ‘ल क्लासे’ महत्वपूर्ण

फॅशन डिझाईन क्षेत्राच्या सखोल ज्ञानासाठी ‘ल क्लासे’ महत्वपूर्ण

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या वतीने वार्षिक फॅशन शो

पुणे : सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचालित सुर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे (एसआयएफटी) आयोजित ‘ल क्लासे’ फ़ॅशन शो नुकताच पार पडला. पृथ्वी, अवकाश, वायू, अग्नी व पाणी या पंचमहाभूतांची अनुभूती यामधून घडले. विद्यार्थ्यांनी बनवलेली आकर्षक आणि कलात्मक डिझाइन्स, मॉडेल्सनी त्याचे मनमोहक केलेले सादरीकरण यामुळे यंदाच्या ‘ल-क्लासे’ फ़ॅशन शोने उपस्थितांची मने जिंकली.
संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगतेचे औचित्य साधून यंदा ‘पंचमहाभुतांच्या शक्तीचे प्रकटीकरण’ या संकल्पनेवर हा फॅशन शो झाला. फॅशन शोचे हे बारावे वर्ष होते. फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वैविध्यपूर्ण डिझाईन्स आणि त्यांच्या कलेचे सादरीकरण व्हावे, या उद्देशाने दरवर्षी या शोचे आयोजन केले जाते. विशेष पोशाखाचे परिधान करत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनीही आपल्या रॅम्पवॉकने उपस्थितांची वाहवा मिळवली. ‘मिसेस ग्लोबल युनायटेड लाईफटाईम क्वीन’ डॉ. नमिता कोहोक, विधिज्ञ डॉ. गीता कस्तुरी व मेकअप आर्टिस्ट तन्वी भंडारे यांनी ज्युरी म्हणून काम पहिले.
 
फॅशन जगतातील आणि चित्रपट सृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांसह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आणि हजारो विद्यार्थी पालकांनी या शोला उपस्थिती लावली. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, डॉ. किमया गांधी, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, प्रभारी प्राचार्या डॉ. सायली पांडे, विभागप्रमुख रेणुका घोसपुरकर आदी उपस्थित होते. विभागप्रमुख पूजा विश्वकर्मा, खुशबू गजबी, प्रियांका कामठे, शिखा सारडा, अखिला मुरामट्टी, मोनिका कर्वे, प्रतिग्या विष्णू यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
यंदापासून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच कोरियोग्राफी, मॉडेल ग्रूमिंग व रॅम्प वॉक केला. विद्यार्थ्यांतील दडलेले कलागुण प्रकाशझोतात आणण्याचा हा आगळावेगळा प्रयत्न होता. ‘पृथ्वी’ संकल्पनेला सर्वोत्तम सादरीकरणाचा सन्मान मिळाला. विधी जैन, हर्षदा गुरव, प्राची खेडेकर, भक्ती पटेल व अंजली शाह या विद्यार्थिनींनी एकत्रितपणे ‘पृथ्वी’ संकल्पनेला सौंदर्य, वैविध्यता, द्वैत, चैतन्यमय पैलूंची जोड देत आकर्षक कपड्यांची निर्मिती केली. ही वस्त्रे परिधान करून निकिता चौधरी हिने तितक्याच मोहकपणे रॅम्पवॉक करत सादरीकरण केले. सर्वोत्तम डिझाइनरचा पुरस्कार संजना यन्नम (स्पेस), श्रेया इंगुळकर (वायू), प्रगती अंबाडकर (अग्नी), आरती सोळंकी (जल) व हर्षदा गुरव (पृथ्वी) यांना मिळाला.
 
अनेक हिंदू आणि बौद्ध धर्मग्रंथांमध्ये अवकाश, वायू, अग्नि, जल आणि पृथ्वी या पाच गूढ घटकांचे सृष्टीच्या क्रमाने वर्णन केले आहे. भगवद्गीता, ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार, हे पाच घटक विश्वातील सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टींसाठी जबाबदार आहेत. विश्वातील सर्व वस्तू या पाच मूलभूत घटकांच्या संयोगाने बनलेल्या आहे, असे आयुर्वेदानेही म्हटलेले आहे.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात चांगले करिअर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘ल क्लासे’सारखे उपक्रम विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट डिझाईनर, कलाकार शोधण्यासाठी उपयुक्त ठरतात. व्यावसायिक स्वरूपाच्या फॅशन शो प्रमाणे याचे विद्यार्थ्यांनी आयोजन केले होते. यंदा सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनने मोठ्या दिमाखात रौप्य महोत्सव साजरा केला. या वर्षाची सांगता अशा सुंदर सोहळ्याने झाली असून, विद्यार्थ्यांनी पंचमहाभूतांच्या संकल्पनेवर सुरेख सादरीकरण केले.”
  
प्रा. रेणुका घोसपुरकर म्हणाल्या, “फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना ग्लॅमरस दुनियेची ओळख व्हावी, त्यांच्या कलाकृतींना व्यासपीठ मिळावे, यासाठी ‘ल क्लासे’ फॅशन शो होतो. यंदा विद्यार्थ्यांनी पंचमहाभूते आणि त्यांची शक्ती आपल्या सादरीकरणातून कलात्मक पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न केला. यंदा विद्यार्थ्यांमधूनच मॉडेल्स निवडण्यात आले होते.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *