एकल महिलांच्या सन्मानासाठी ‘अभया’ संबोधावे

एकल महिलांच्या सन्मानासाठी ‘अभया’ संबोधावे

‘वंचित विकास’कडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे; शासन आदेश काढण्याची मागणी

पुणे : समाजातील एकल महिलांना विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, बिन लग्नाची, वांझ, एकटी बाई, नवऱ्याने सोडलेली, नवरा सोडलेली असे अपमानास्पद शब्द वापरू नयेत. तसेच या एकल महिलांच्या सन्मानासाठी ‘अभया’ या शब्दाने संबोधावे, असे आवाहन वंचित विकास संस्थेच्या शिष्टमंडळाने मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले. या संदर्भात सरकारने शासन आदेश काढण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. अजित पवार यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन वंचित विकास संस्थेला दिले.

संस्थेच्या कार्यवाह व संचालक मीना कुर्लेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी मा. मुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील नवीन विश्रामगृहात भेट घेऊन निवेदन दिले. वंचित विकास संस्थेच्या संचालक सुनीता जोगळेकर, सहकार्यवाह देवयानी गोंगले, सदस्य मीनाक्षी नवले, चैत्राली वाघ, डॉ. श्रीकांत गबाले, तेजस्विनी थिटे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते योगेश गोगावलेही उपस्थित होते.

मीना कुर्लेकर म्हणाल्या, “वंचित विकास संस्था गेली ३७ वर्षे समाजातील विविध वंचित घटकांच्या प्रगतीसाठी काम करत आहे. महिलांसाठी काम करत असताना असे जाणवले की, ‘महिलांना उद्देशून आपण अनेक शब्द वापरतो; मात्र, त्या शब्दांचा त्या महिलांच्या मनावर आघात होत असतो.’ ही बाब लक्षात आल्यावर आम्ही त्याला सन्मान देणारा योग्य शब्द वापरण्याबाबत विचार केला. तेव्हा ‘अभया’ हा शब्द सर्वानुमते पुढे आला. “अभया म्हणजे परिस्थितीला न घाबरता सक्षमपणे तोंड देणारी महिला होय.”

या महिलांचा सन्मान करणाऱ्या विचाराला राज्यभरातून मान्यता देणाऱ्या हजारो स्वाक्षऱ्या, लेखी पत्रे आली आहेत. हे अभियान मागील दहा वर्षापासून सातत्याने सुरु असून, समाजातील विविध मान्यवरांना भेटून याची जनजागृती करत आहोत. मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही सदर निवेदन पाठवले असून, त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आलेला आहे. आजवर एकल महिलांना सन्मानाने संबोधण्यासाठी कोणीही विचार केलेला नव्हता. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारसरणीचे हे सरकार असून, धडाडीने निर्णय घेणाऱ्या पुरोगामी विचारांचे मा. मुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय तातडीने घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी, ही आमची विनंती आहे”, असे मीना कुर्लेकर यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *