तहसीलदार सुरेश काशीद यांचे प्रतिपादन; ‘सुदर्शन’कडून शालेय, क्रीडा साहित्याचे वाटप
पुणे : “सुदर्शन कंपनीकडून राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाना ग्रामस्थांचेही सहकार्य असावे. पुढील कालावधीत गावाच्या विकासासाठी स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ व सुदर्शन असे एकत्रित नियोजन करता येईल. स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक ते प्रयत्न केले जातील. आजवर सुदर्शन व्यवस्थापनाकडून सामाजिक विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न होत असल्याचे समाधान आहे,” असे प्रतिपादन तहसीलदार सुरेश काशिद यांनी केले.
सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज महाड यांच्याकडून रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा कांबळे/महाड, उर्दू शाळा, शिंदेकोंड व अंगणवाडी येथे शालेय, क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी काशीद बोलत होते. गटशिक्षणाधिकारी सविता पालकर, सुदर्शन केमिकलच्या उपमहाव्यवस्थापक (सीएसआर-ऍडमिन) माधुरी सणस, व्यवस्थापक (आयआर) संदीप काशिद, सरपंच महाडिक, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, गावकरी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांकडून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, कोरोना योद्धे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सुदर्शन केमिकलच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत महाड ग्रामीण भागाच्या शाश्वत सामाजिक विकासासाठी सातत्याने विविध प्रकल्प राबविण्यात येतात. कांबळे महाड येथील शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सुदर्शन विशेष प्रयत्न करीत आहे. विज्ञान प्रयोगशाळा, शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य देण्यात येते. औद्योगिक प्रगतीसह सामाजिक विकासाचे ध्येय सुदर्शनने कायमच बाळगले आहे, असे माधुरी सणस यांनी नमूद केले.
सुदर्शनकडून सोलर पथदिवे, कचरा व्यवस्थापन, शाळांचे आयएसओ मानांकन असे उपक्रम राबविले जातात. सुदर्शनच्या या मदतीमुळे गावाचा विकास झपाट्याने होत असल्याचे सरपंच महाडिक यांनी सांगितले. पंचायत समितीकडून महाड विभातील जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्वरूपात विकसित करण्यात येत आहेत. त्यामध्ये सुदर्शनकडून होणाऱ्या प्रयत्नामुळे विशेष सहकार्य होत असून, त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक व दुर्बल घटकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होत आहे, असे पालकर यांनी नमूद केले.