सांगवीच्या विद्यार्थिनीकडून पुननिर्मितीचे मशिन

सांगवीच्या विद्यार्थिनीकडून पुननिर्मितीचे मशिन

इंडियन पेटंट जर्नल’मध्ये आराखड्याची नोंद; पर्यावरणपूरक ड्युअल ऑपरेटिंग उपकरण

पुणे: हर्षदा नामदेव तळपे या विद्यार्थिनीने इतर सहकारी विद्यार्थ्यांच्या सहकार्यानि बनवलेल्या मशिनमध्ये जुन्या मास्कचे विघटन तसेच त्यातून पुननिर्मितीही करता येणार आहे. मशिनच्या आराखड्याची इंडियन पेटंट जर्नलमध्ये नोंद झाली आहे.

हर्षदा तळपे ही आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. हर्षदाने ‘ड्युअल ऑपरेटिंग मास्क व्हेडिंग मशिन विथ यूज्ड मास्क डिस्ट्रॉयिंग युनिट बाय क्रशिंग मेथड’ या मॉडेलची निर्मिती केली आहे. वापरलेले मास्क नष्ट करण्यासोबतच नविन मास्क यातून एटीएम मशिन सारखे घेता येणार आहेत.

या मशिनद्वारे आपणास सर्जिकल व एन ९५ मास्क मिळतील. तसेच आपणास आपले हातदेखील सॅनिटाइज करता येणे शक्य होईल. सोबतच वापरलेल्या मास्कचे निर्जंतुकीकरण करून, तो नष्टदेखील करता येईल. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या मशिनचे भारत सरकारकडे पेटंट फाइल केले असून, त्याचे पेटंट जर्नलमध्ये प्रकाशन झाले आहे.

हर्षदा तळपे व सहकारी अक्षयकुमार शिंदे, शुभम चतुर्वेदी, रितूला तायडे यांनी प्रा. श्यामसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने या स्वयंचलित मॉडेलची निर्मिती केली. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या मालथी जेसूडासोन, संचालक डॉ. नीरज व्यवहारे, तेजस पाटील, अध्यक्ष सतेज पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

वैशिष्ट्ये…

● नवीन मास्क घेणे व वापरलेला मास्क नष्ट करणे सहज सोपे

● वापरून झालेल्या मास्कची योग्य विल्हेवाट लावल्याने परिसर स्वच्छ राहण्यास मदत

● हात निर्जंतुक करणे, नवीन मास्क घेणे, वापरलेला मास्क नष्ट करणे सर्व एकाच मशिनवर

● मशिन सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी हाताळण्यास सोपे

● पर्यावरणपूरक आणि प्रदूषणरहित असल्याने या मशिनची देखभाल करणे सुलभ

● उपकरणामुळे कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी निश्चित हातभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *