प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे प्रतिपादन; ‘लायन्स’तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचा आनंद मेळावा
पुणे: “सामान्य मुलांना शिकवताना अनेक आव्हाने असतात. अशावेळी सेवाभावी, संयमी वृत्तीने दिव्यांग मुलांना घडविण्याचे, त्यांना स्वावलंबी व स्वाभिमानी बनवण्याचे काम तुम्ही शिक्षक करत आहात. अशा विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी योगदान देत आहात, ही कौतुकास्पद बाब आहे,” असे प्रतिपादन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “दिव्यांग मुलांना घडवणारे शिक्षक धैर्याचे काम करीत आहेत. शासन, प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनी त्यांना सक्षम करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. त्यातून निसर्गातील असमतोल कमी होण्यास मदत होईल. त्यांचे अवलंबित्व कमी करून त्याचे रूपांतर संसाधनात व्हावे. सामाजिक जाणीव असलेली अनेक मंडळी समाजात कार्यरत असून, त्यांचे कार्य सरकारला पूरक आहे. सीएसआरमधून काही चांगले उपक्रम राबवता येतील का, यावर भर दिला पाहिजे. ‘दिव्यांग’ या संकल्पनेवर भव्य प्रदर्शन भरवावे.”
प्रवीण पुरी म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षक, आई वडिलांचे योगदान असते. दिव्यांग शिक्षकांना प्रशिक्षण, नवीन तंत्रज्ञान वापराचा उपयोग यासाठी प्रोत्साहन दिले जाते. विनाअनुदानित दिव्यांग शाळांनाही विशेष अनुदान देण्याबाबत योजना राबवली जात आहे. दिव्यांग कल्याणासाठी नवनवीन उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.”
डॉ. दीपक शहा म्हणाले, “समाजात चांगले काम करणारी लोकं आहेत. सेवाभावी लोकांमुळे समाज घडत असतो. दिव्यांग शिक्षक अद्वितीय काम करत आहेत. त्यांच्यातील सहनशीलता प्रेरक आहे.” उपेक्षित घटकाला सहाय्य करून त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण पसरवण्याचा प्रयत्न असल्याचे रमेश शहा म्हणाले.
सीमा दाबके प्रास्ताविकात म्हणाल्या, “दिव्यांगासाठी गेली चार दशके उपक्रम सुरू आहे. या दिव्यांगाना घडवणार्या शिक्षकांसाठी उपक्रम करावा, या भावनेतून गेल्या वर्षीपासून हा आनंद मेळावा घेतला जात आहे. ही एकप्रकारे त्यांच्याप्रती कृतार्थता व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे.”
प्रज्ञाचक्षू ब्रह्मदेव काटे यांच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अंजली चौथाई यांनी सूत्रसंचालन केले.