एस. सोमनाथ ‘इस्रो’चे नवे अध्यक्ष

एस. सोमनाथ ‘इस्रो’चे नवे अध्यक्ष

पुणे : वरिष्ठ अवकाश शास्त्रज्ञ आणि रॉकेट तज्ज्ञ एस. सोमनाथ यांची अवकाश विभागाचे सचिव आणि अवकाश आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सोमनाथ हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) पुढील तीन वर्षे नेतृत्व करतील. याआधी सोमनाथ हे तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे (व्हीएसएससी) संचालक म्हणून कार्यरत होते.

‘इस्रो’चे मावळते अध्यक्ष डॉ. के. सिवन यांचा कार्यकाळ येत्या १४ जानेवारीला संपत आहे. त्यानंतर सोमनाथ भारतीय अवकाश कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारतील. केरळच्या कोल्लम येथील टीकेएम कॉलेजमधून बीटेकची पदवी मिळवल्यानंतर सोमनाथ यांनी एअरोस्पेस इंजिनिअरिंगमधील पदव्युत्तर शिक्षण बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून पूर्ण केले. त्यानंतर १९८५ मध्ये ते ‘इस्रो’त रुजू झाले.

ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (पीएसएलव्ही) आणि नव्या श्रेणीतील भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक (जीएसएलव्ही मार्क ३) या रॉकेटच्या विविध यंत्रणा निर्माण करण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. ‘इस्रो’च्या सर्व रॉकेटमधील द्रवरूप इंधनाचे इंजिन आणि क्रायोजेनिक इंजिन विकसित करणारे लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम्स सेंटर आणि रॉकेटचा विकास करणाऱ्या विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

मानवी अवकाश मोहिमेतील पहिला टप्पा असणाऱ्या केअर या प्रयोगाचे नेतृत्व सोमनाथ यांनी केले होते. भविष्यातील शक्तिशाली रॉकेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या सेमी क्रायोजेनिक इंजिनाच्या विकासाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. सोमनाथ यांची नेमणूक पुढील तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे.

क्रायोजेनिक इंजिनाची चाचणी यशस्वी

भारताच्या गगनयान मोहिमेत वापरण्यात येणाऱ्या सीई २० या क्रायोजेनिक इंजिनाची जमिनीवरील पहिली पात्रता चाचणी तामिळनाडूच्या महेंद्रगिरी येथील ‘इस्रो’ प्रोपल्जन कॉम्प्लेक्स येथे बुधवारी यशस्वीपणे पार पडली. हे इंजिन बुधवारी ७२० सेकंद कार्यरत होते. या काळात इंजिनाने अपेक्षेनुसार काम केल्याचे ‘इस्रो’ने कळवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *