कुमार केतकर यांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

कुमार केतकर यांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

विलास बडे, विनोद यादव, शेख रिजवान यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे वर्ष २०२१ चे पत्रकारिता पुरस्कार जाहीर

मुंबई दि. ६: सखोल विचार, परखड विवेचन आणि ठोस भूमिका घेऊन वाचक – श्रोत्यांच्या जाणिवा रुंदवण्याचे काम करत पत्रकारिता क्षेत्रात योगदान दिलेले पत्रकार, संपादक, वक्ते – भाष्यकार कुमार केतकर यांना वर्ष २०२१ सालचा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर – न्यूज १८ लोकमत वृत्त वाहिनीचे विलास बडे, दैनिक भास्करचे विनोद यादव आणि दैनिक बीड रिपोर्टरचे प्रतिनिधी शेख रिजवान शेख खलील यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.

पत्रकार दिनाच्या निमित्ताने मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर आणि कार्यवाह प्रमोद डोईफोडे यांनी गुरुवारी (ता. ६) राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा केली. मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.कुमार केतकर यांनी डेली ऑब्झर्व्हर, इकॉनॉमिक टाईम्स, महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, लोकमत, दिव्य मराठी अशा वृत्तपत्रात उच्च पदे भूषविली आहेत. बदलते विश्व, त्रिकालवेध, ओसरलेले वादळ, एडिटर्स चॉईस, विश्वामित्राचे जग, शिलंगणाचे सोने, मोनालिसाचे स्मित, ज्वालामुखीच्या तोंडावर अशी विपुल ग्रंथसंपदा केतकर यांनी निर्माण केली आहे.

राज्यस्तरीय इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधीसाठीचा पुरस्कार न्यूज १८ लोकमत वाहिनीचे विलास बडे यांना जाहीर करण्यात आला आहे. बोगस बायोडिझेल घोटाळ्याचा बडे यांनी भांडाफोड करत वार्षिक ७३ हजार कोटींची करचुकवी बातमीतून उघडकीस आणली होती. मुद्रीत माध्यम प्रतिनिधीसाठी देण्यात येणारा राज्यस्तरिय पुरस्कार बीड येथील दैनिक बीड रिपोर्टरचे प्रतिनिधी शेख रिजवान शेख खलील यांना जाहीर झाला आहे. बीड जिल्ह्यातील इनामी व वक्फ बोर्ड जमिनींच्या परस्पर विक्रीचे उत्खनन शेख यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमांतून चव्हाट्यावर आणले होते.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांसाठी दिला जाणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दैनिक दिव्य भास्करचे विनोद यादव यांना जाहीर करण्यात आला आहे. कोरोना टाळेबंदीकाळात मुंबई ते वाराणसी असा १५०० किमी प्रवास करत यादव यांनी ग्राउंड रिपोर्टिंग केलेले आहे.पुरस्कार निवड समितीमध्ये लोकसत्ताचे संतोष प्रधान,लोकमतचे यदु जोशी आणि दिव्य मराठीचे अशोक अडसूळ यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *