महिला आरक्षणावरून सुषमा अंधारे यांचा फडणवीसांना सवाल; ‘महिला मुख्यमंत्री द्यायला तयारी आहे का?’

महिला आरक्षणावरून सुषमा अंधारे यांचा फडणवीसांना सवाल; ‘महिला मुख्यमंत्री द्यायला तयारी आहे का?’

पुणे : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत विविध प्रश्न उपस्थित केले.

पत्रकार परिषदेत बोलताना अंधारे म्हणाल्या की, महिला आरक्षणाचा मुद्दा नवीन नसून १९५१ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी यासंदर्भात विधेयक मांडले होते. मात्र त्याला विरोध झाल्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आज महिलांसाठी तशीच भूमिका घेण्याची तयारी सत्ताधाऱ्यांकडे आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भाजप स्वतःला पुरोगामी म्हणवत असेल, तर २०२९ मध्ये सत्तेत आल्यावर देशाला महिला पंतप्रधान आणि महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ च्या सरसंघचालक पदावरही महिलांची नियुक्ती करण्याचे आव्हान त्यांनी दिले.

दरम्यान, महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेलाही अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘विधेयकाची भ्रूणहत्या’ असा शब्दप्रयोग चुकीचा असल्याचे सांगत त्यांनी आक्षेप नोंदवला. तसेच महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांचा उल्लेख करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या पुस्तकांचे सार्वजनिक वाचन करावे, असे आव्हान त्यांनी दिले.

अंधारे यांनी २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याचे सांगणारे मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सोशल मीडिया पोस्टही दाखवून दिले.

याशिवाय, लोकसभा जागांच्या पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून उत्तर-दक्षिण वाद निर्माण करण्याची गरज काय होती, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच अशोक खरात यांच्या  मालमत्तेबाबत सखोल चौकशीची मागणी करत, या प्रकरणात मोठी नावे समोर येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले.