मानवतावाद, बंधुतेचा विचार हीच भारताची ओळख

मानवतावाद, बंधुतेचा विचार हीच भारताची ओळख

गझलकार मीना शिंदे यांचे मत; पहिल्या विश्वबंधुता काव्यमहोत्सवाचे उद्घाटन

पुणे : “जाती-धर्माच्या भिंती भेदून बंधुत्वाचा धागा विणत ‘मानव तितुका एकची आहे’ असा मानवतावादी आणि बंधुभावाचा विचार देणारा आपला भारत देश आहे. सांस्कृतिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या समृद्ध असलेला भारत विश्वात बंधुभावाची पेरणी करण्याचे काम करत आहे. बंधुतेचा विचार, मानवतावादी दृष्टीकोन हीच भारताची ओळख आहे,” असे मत पहिल्या विश्वबंधुता काव्यमहोत्सवाच्या अध्यक्षा, गझलकार मीना शिंदे यांनी व्यक्त केले.

विश्वबंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने बंधुता लोकचळवळीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त (विश्वबंधुतादिन) आयोजित पहिल्या विश्वबंधुता काव्यमहोत्सवाचे उद्घाटन मीना शिंदे व साहित्यिक प्रा. शंकर आथरे यांच्या हस्ते झाले. पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, कवयित्री मधुश्री ओव्हाळ, साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे, कवी गुलाबराजा फुलमाळी, प्रा. डॉ अशोककुमार पगारिया, संगीता झिंजुरके आदी उपस्थित होते. रमेश पतंगे यांच्या चौघडा वादनाने सभागृहात चैतन्य पसरले होते. प्रिया माळी यांच्या ‘गुलमोहर फुलताना’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. अनिल गव्हाणे (बीड), रविंद्र देशमुख (मुरबाड), मनीषा गोरे (सोलापूर), वीणा व्होरा (पंढरपूर), राहुल मुंडे (ठाणे), विजय वासाडे (नागपूर), उदय क्षीरसागर (भिवंडी), प्रीती वानखेडे (वर्धा), अनिल केंगार (सांगोला), राजेंद्र वाणी (मुंबई), डॉ. अहेफाज मुलाणी (श्री क्षेत्र देहू) यांना ‘बंधुता शब्दक्रांती साहित्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
 
दुपारच्या सत्रात रानकवी नामदेव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी काव्यपंढरी कविसंमेलन झाले. दिनेश मोडोकर (पाथर्डी), विनोद सावंत (पलूस) यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्ञानेश्वर शिंदे (कोपरगाव), विजयकुमार पांचाळ (छत्रपती संभाजीनगर), चंद्रकांत धस (पुणे), डॉ. सुशील सातपुते (लातूर), शरयू पवार (पुणे), पल्लवी पतंगे (मुंबई), प्रतिभा मगर (पुणे), रुपाली भोरकडे (शिक्रापूर), जयश्री रोहणकर (अमरावती), रोहिदास शिखरे (छत्रपती संभाजीनगर), सुनील बोरसे (चाळीसगाव) या निमंत्रित कवींनी सहभागी होत हृदयस्पर्शी कविता सादर केल्या. विलास ठोसर (आकोट) यांना प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार, संदीप कांबळे (भिवंडी) यांना प्रकाशपर्व साहित्य पुरस्कार, गुलाबराजा फुलमाळी (नेवासा) यांना प्रकाशगाथा साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 
 
मीना शिंदे म्हणाल्या, “साहित्यिकांनी व्यापक दृष्टिकोन ठेवत सृजन साहित्याची निर्मिती करावी. साहित्यातून, कवितेतून समाजात घडणाऱ्या घटनांवर, माणसातील माणूसपणावर भाष्य करून बंधुतेचा विचार सर्वदूर रुजविण्यावर आपण भर द्यायला हवा. सर्वच महापुरुषांनी समानता, बंधुता, अहिंसा, वात्सल्य, प्रेमभावाची शिकवण दिली आहे. त्याचा अंगीकार करून बंधुभावाने एकत्रित राहिलो, तर ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना सत्यात उतरेल.”
 
बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “भारतीय संविधानाने सांगितलेले बंधुत्व विश्वातील प्रत्येकात रुजवले पाहिजे. संविधान, लोकशाही धोक्यात असताना लेखक, कवी, पत्रकार, साहित्यिकांनी सत्तेचा बटीक असता कामा नये. या सर्वांनीच परखडपणे आपली मते मांडावीत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. सत्य मांडण्यासाठी शोधकवृत्ती जपावी.”
 
रोकडे यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करण्यात आले. प्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अशोककुमार पगारिया, प्रा. शंकर आथरे, गुलाबराजा फुलमाळी यांनी मनोगत व्यक्त केले. मधुश्री ओव्हाळ यांनी स्वागत प्रास्ताविक केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बंडोपंत कांबळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *