प्रशासकीय सेवा, चित्रपटांमध्ये समाज परिवर्तनाची मोठी ताकद

प्रशासकीय सेवा, चित्रपटांमध्ये समाज परिवर्तनाची मोठी ताकद

बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांचे प्रतिपादन; मृणाल वानखेडे, श्रद्धा झिंजुरके यांना ‘बंधुताभूषण पुरस्कार’ प्रदान

पुणे : “प्रशासकीय सेवा, चित्रपटांच्या माध्यमातून समाज परिवर्तन करता येते. आमिष दाखवणारी ही दोन्ही क्षेत्रे आहेत. मात्र, आपल्यातील विवेक, बंधुतेचा विचार जागृत ठेवून चारित्र्य जपावे आणि समाजहिताचे काम करावे. पैशांच्या मागे न धावत उघड्या डोळ्यांनी समाजाकडे बघत त्यातील चांगले वेचून घ्यावे. आपल्याला घडवणाऱ्या समाजाप्रती कायम कृतज्ञतेची भावना ठेवावी. चांगल्या मार्गाने मिळालेला पैसा आत्मिक समाधान देतो,” असे प्रतिपादन बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी केले.

 
विश्वबंधुता साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा बंधुताभूषण पुरस्कार निर्माती, अभिनेत्री मृणाल वानखेडे व शिक्षणाधिकारी श्रद्धा झिंजुरके यांना प्रकाश रोकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नवी पेठेतील पत्रकार भवनमध्ये झालेल्या पहिल्या विश्वबंधुता काव्यमहोत्सवाच्या समारोपात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. प्रसंगी मंदाकिनी रोकडे, ज्येष्ठ कवी, साहित्यिक प्रा. शंकर आथरे, साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे, कवयित्री मधुश्री ओव्हाळ, संगीता झिंजुरके आदी उपस्थित होते.

श्रद्धा झिंजुरके म्हणाल्या, “स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळालेल्या यशात कुटुंबीयांचा, बंधुता परिवाराचा मोठा वाटा आहे. या प्रवासात अनेकदा चढउतार येतात. मात्र, चिकाटी व सातत्यपूर्ण प्रयत्न आपल्याला यशाकडे घेऊन जातात. समाजसेवा करण्याची संधी मिळाली असून, शिक्षण क्षेत्रासाठी आणि समाजासाठी चांगले योगदान देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.”

 
मृणाल वानखेडे म्हणाल्या, “बंधुतेचा धागा अनेक सीमा ओलांडून माणूस जोडण्याचे काम करतो. माझ्या पालकांनी दिलेले प्रोत्साहन, निर्णयाचे स्वातंत्र्य मला यश मिळवण्यात उपयोगी ठरले. नाट्य-चित्रपट क्षेत्रात काम करतानाही याचा फायदा होतो. बंधुतेचे हे कार्य मोठे असून, याचे दस्तावेजीकरण करण्याची माझी इच्छा आहे. लवकरच त्यावर माहितीपट करणार आहे.”

रामदेव सित्रे (अमरावती), सुनीता कावसनकर (छत्रपती संभाजीनगर), मधुराणी बनसोड (वाशीम), सुमन आव्हाड (पुणे), सतीश मालवे (अमरावती), विजय जाधव (शिक्रापूर), करुणा कंद (उरुळी कांचन), चंदन तरवडे (कोपरगाव), संगीता गव्हाणे (पुणे), विद्या अटक (पुणे), सविता कुंजीर (पुणे) यांना बंधुता मायमराठी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 
प्रा. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. स्वागत प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी केले. संगीता झिंजुरके यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *