अनु मलिक लाईव्ह इन कॉन्सर्ट; सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्टस् व सूर्यदत्त प्रॉडक्शन हाऊसचा सहभाग
पुणे: प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक व अबू मलिक यांच्यासह सहकलाकारांनी बहारदार सादरीकरण करीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मुंबईतील श्री षण्मुखानंद सभागृहात ‘अनु मलिक लाईव्ह इन कॉन्सर्ट’ या संगीत मैफलीचे नुकतेच आयोजन केले होते. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्टस् व सूर्यदत्त प्रॉडक्शन हाऊसचा यामध्ये अकॅडमिक पार्टनर म्हणून सहभाग होता. या कार्यक्रमावेळी ‘सूर्यदत्त’तर्फे अनु मलिक, अबू मलिक व सर्व कलाकारांना ‘सूर्यदत्त एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले.
अबू मलिक यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मलिक बांधून लाईव्ह ऐकण्यासाठी सभागृह तुडुंब भरले होते. भारतातील नामवंत गायक-कलाकारांच्या अविस्मरणीय सादरीकरणांनी संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. अशा या भव्य संगीत मैफलीत भागीदारी करीत ‘सूर्यदत्त’ने परफॉर्मिंग आर्ट्स, संस्कृती आणि शिक्षण यांचा तिहेरी संगम साधला. अनुभवाधारित व सर्वांगीण शिक्षण दृष्टीकोनातील दीर्घकालीन बांधिलकी अधोरेखित केली.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, पुणे येथील सायबर सुरक्षा, फार्मसी, फिजिओथेरपी, फॅशन डिझाईन, एमसीए आणि बीसीए या विविध शाखांतील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम पाहिला. त्यांच्यासोबत २० शिक्षक उपस्थित होते. ‘सूर्यदत्त’च्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली. या कॉन्सर्टमध्ये शब्बीर कुमार, नक्ष अज़ीज़, दिव्या कुमार, शाहिद मल्ल्या, पापोन, श्रीजित, अनमोल मलिक, संजीवनी भेलांडे, प्रीती-पिंकी, शिफा, निष्ठा शर्मा, जान कुमार सानू, श्रीकांत नारायण, सारिका सिंह, बंदिश वाज, शिवांग माथूर, शाहील शिवराम या कलाकारांनी सादरीकरण केले. या सर्व कलाकारांच्या परफॉर्मिंग आर्ट्स क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेत ‘सूर्यदत्त एक्सलन्स अवॉर्ड’ने गौरविण्यात आले. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव श्रीमती सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा श्रीमती स्नेहल नवलखा, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्टस् (एसआयपीए) या संस्थेत भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य व नाट्यामध्ये पारंपरिक व शुद्ध प्रशिक्षण दिले जात आहे. इथे विद्यार्थ्यांना गुरू-शिष्य परंपरेतून दिग्गज गुरू व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यासह त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जातो. उदयोन्मुख कलाकारांना नाट्य, चित्रपट व टेलिव्हिजन क्षेत्रात संधी उपलब्ध करण्यासाठी सूर्यदत्त प्रॉडक्शन हाऊसची (एसपीएच) स्थापना करण्यात आली आहे. मोबाईल फिल्म, कलाकार सन्मान, कार्यशाळा व लाईव्ह इव्हेंट्स आदी उपक्रम येथे घेण्यात येतात.”
आजवर ‘सूर्यदत्त’ने संगीत, नृत्य व चित्रपटसृष्टीतील जागतिक दर्जाच्या दिग्गजांशी सहकार्य केले आहे. ‘अनु मलिक लाईव्ह इन कॉन्सर्ट’ ही त्याच परंपरेची साक्ष आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्ता अनुभवता यावी, उद्योग तज्ज्ञांशी थेट संपर्क मिळावा आणि परफॉर्मिंग आर्ट्समधील त्यांच्या कारकिर्दीला प्रेरणा मिळावी, यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे आहे. अनु मलिक व अबू मलिक यांना याआधीच सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांचे ‘सूर्यदत्त’शी असलेले दीर्घकालीन नाते संस्थेच्या भारतीय संगीत व सांस्कृतिक परंपरेच्या जतनाबाबतच्या निष्ठेचे प्रतीक आहे,” असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.