अॅड. वंदना चव्हाण यांचे मत; ‘सीवायडीए’तर्फे जागतिक युवा दिनी ‘ग्रीन युथ मुव्हमेंट’चे उद्घाटन
पुणे : “भारताच्या लोकसंख्येपैकी ५० टक्के लोकसंख्या ही तरुणांची आहे. तरुणांनी ठरवले, तर ते काहीही करु शकतात. येत्या काळात तरुणांनी पर्यावरणाशी निगडीत समस्या लक्षात घेऊन सामाजिक दायित्वाच्या भावनेतून पर्यावरण विषयात काम करायला हवे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दूत म्हणून काम करावे,” असे मत माजी खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले (Center for youth development and activities CYDA Green youth movement Advocate Vandana Chavan Avinash Salve environment awareness waste management) .
सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड अॅक्टीव्हीटीज (सीवायडीए) यांच्यातर्फे जागतिक युवा दिनाच्या (१२ ऑगस्ट) निमित्ताने ‘ग्रीन युथ मूव्हमेंट’चे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर तेरे देस होम्सच्या डॉ. नम्रता जैटली, नगरसेवक अॅड. अविनाश साळवे, नगरसेविका सुमय्या नदाफ, सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड अॅक्टीव्हीटीजचे संस्थापक संचालक मॅथ्यू मट्टम आदी उपस्थित होते.
अॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या, “शहरात पूर्वी भर उन्हाळ्यातही फॅनची गरज लागत नव्हती. आता मात्र एसीशिवाय बसवत नाही. आता थोडा पाऊस झाला, तरी शहरात पूरस्थिती निर्माण होते. जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणाचा दिवसेंदिवस ऱ्हास होत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे शहरांमध्ये कार्बन डायऑक्साईडडचे उत्सर्जन वाढत आहे. आता याकडे दुर्लक्ष केले, तर येणाऱ्या पिढीला दप्तरात वह्या-पुस्तकांसोबत ऑक्सिजन सिलेंडर घेऊन फिरावे लागेल.”
अॅड. अविनाश साळवे म्हणाले, “देशाप्रती आणि समाजाप्रती प्रत्येकाचे उत्तरदायित्व आहे. आज ‘ग्रीन युथ मूव्हमेंट’च्या माध्यमातून युवाशक्ती पर्यावरण विषयात काम करण्यासाठी पुढे आली आहे. येत्या काळात आपण एकत्र मिळून कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण विषयात काम करुया.”
मॅथ्यू मट्टम यांनी प्रास्ताविकात पर्यावरणाची चळवळ सुरु करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना कचरा व्यवस्थापनाबाबत मानसिकता बदलल्याशिवाय भारत विकसित होणार नाही. स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन यावर काम करण्यासाठी ही चळवळ उपयुक्त ठरेल, असे नमूद केले.
यावेळी या चळवळीची समन्वयक दिक्षा मेहेत्रे, नगरसेविका सुमय्या नदाफ आणि परमा नॅचरल्सच्या गीता प्रकाश यांनी मनोगत व्यक्त केले. देवेंद्र बनसोडे व आकांक्षा अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. पौर्णिमा चलवादी हिने आभार मानले.
