चित्रभारती महोत्सवात ‘कूस’ सर्वोत्कृष्ट; अमेरिका, फ्रान्समध्येही मराठी लघुपटाचा झेंडा

चित्रभारती महोत्सवात ‘कूस’ सर्वोत्कृष्ट; अमेरिका, फ्रान्समध्येही मराठी लघुपटाचा झेंडा

डॉ. ज्ञानेश्वर जाधवर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक; अनुया कळसकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार; ऊसतोड मजूर महिलांचे जीवन, गर्भाशय काढण्यावर प्रकाश 

पुणे: प्रभात चित्र मंडळ, रोटरी क्लब ऑफ ठाणे एसेस आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चित्रभारती २०२६’ लघुपट महोत्सवात डॉ. ज्ञानेश्वर जाधवर दिग्दर्शित ‘कूस’ (द वूम्ब) या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान पटकावला. याचबरोबर डॉ. जाधवर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार, तर अभिनेत्री अनुया कळसकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडलेल्या महोत्सवानंतर ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे खासदार नरेश म्हस्के, प्रभात चित्र मंडळाचे सचिव डॉ. संतोष पाठारे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर महिलांचे श्रमजीवन, आरोग्यविषयक समस्या, मासिक पाळीशी संबंधित अडचणी आणि वाढत्या गर्भाशय काढण्याच्या घटनांचे वास्तववादी चित्रण ‘कूस’ या लघुपटातून करण्यात आले आहे. उचित मीडिया सर्व्हिसेस, पुणे निर्मित या लघुपटाचे निर्माते जीवराज महादेव चोले असून, कथा, पटकथा आणि दिग्दर्शन डॉ. ज्ञानेश्वर जाधवर यांचे आहे, तर संवाद लेखनासाठी विठ्ठल काळे यांनी साथ केली आहे. या लघुपटात अनुया कळसकर, विठ्ठल नागनाथ काळे, वैशाली केंदळे, डॉ. सोनाली घाटणेकर, अनिल कांबळे आणि जीवराज महादेव चोले यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तर अरमान सय्यद आणि जानवी मोरे यांनी बालकलाकार म्हणून काम केले आहे.

राष्ट्रीय स्तरावरील यशाबरोबरच ‘कूस’ने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप पाडली आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी येथे झालेल्या पाचव्या मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ २०२६) अनुया कळसकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला. तसेच ‘कूस’ची निवड फ्रान्समधील प्रतिष्ठित क्लेरमाँ-फेराँ शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल मार्केट २०२६ मध्ये अधिकृतरीत्या झाली होती. याशिवाय ‘कूस’ने कान्स शॉर्ट फिल्म कॉर्नर मार्केटमध्येही सहभाग नोंदविला. जगातील महत्त्वाच्या लघुपट महोत्सवांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या व्यासपीठांवर स्थान मिळाल्याने मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

‘कूस’ने यापूर्वीही अनेक प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले आहेत. सहाव्या मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पेशल ज्युरी मेंशन अवॉर्ड, आठव्या अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट अभिनेता (विठ्ठल काळे) पुरस्कार, १९व्या प्रतिबिंब फिल्म फेस्टिव्हलमधील सर्वोत्कृष्ट पटकथा, दिग्दर्शन आणि ध्वनी संकल्पना पुरस्कार, तसेच पुणे पेशवा फिल्म फेस्टिव्हल २०२६ मधील तृतीय पुरस्कार, सर्वोत्तम पटकथा आणि सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारांचा त्यामध्ये समावेश आहे. याशिवाय जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२६, फोटोजिनी फेस्टिव्हल ऑफ फिल्म्स २०२६, साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हल, पश्चिम बंगाल फिल्म फेस्टिव्हल आणि झारखंड नॅशनल फिल्म फेस्टिव्हल यांसारख्या विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही ‘कूस’ची निवड झाली आहे.

ग्रामीण भागातील स्त्रीआरोग्याचा संवेदनशील आणि दुर्लक्षित विषय प्रभावीपणे मांडणारा ‘कूस’ हा लघुपट सामाजिक भान जपत जागतिक स्तरावर मराठी चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करत असल्याची भावना चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली.