पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या (डब्ल्यूआयआरसी) शिष्टमंडळाने राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांची भेट घेऊन सहकार क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. ही बैठक विधायक आणि फलदायी ठरल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.
‘डब्ल्यूआयआरसी’चे अध्यक्ष सीए सौरभ अजमेरा यांच्या नेतृत्वाखाली व प्रभागीय सहकार समितीचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे ह्यांच्या पुढाकाराने या शिष्टमंडळात आयसीएआय पुणे शाखेचे अध्यक्ष सीए प्रणव आपटे यांच्यासह विभागीय समिती सदस्य सीए राजेश अग्रवाल पुणे शाखेचे उपाध्यक्ष सीए निलेश येवलेकर, खजिनदार सीए नंदकुमार कदम, सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ सीए वसंत गुंड व सतीश मुंदडा उपस्थित होते.
या बैठकीत २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी ऑडिटर पॅनल नोंदणीची मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. तसेच, महाराष्ट्रासाठी प्रस्तावित नव्या सहकार कायद्याच्या निर्मितीत चार्टर्ड अकाउंटंट्सना सहभागी करून घेण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली. आयकर व जीएसटीप्रमाणे धोरणनिर्मितीत सीए इन्स्टिट्यूटचे चे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिनिधींनी नमूद केले.
याशिवाय, सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याची मागणीही करण्यात आली. आर्थिक वर्ष २०१३-१४ पासून या मानधनात कोणताही बदल झालेला नसताना, कामाचा व्याप, नियमांचे पालन आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याकडे प्रतिनिधींनी लक्ष वेधले. या संवादातून सहकार प्रशासन आणि सनदी लेखापरीक्षक यांच्यातील समन्वय अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
