प्रवक्ता निवडीसाठी युवक काँग्रेस घेणार ‘यंग इंडिया के बोल’ स्पर्धा

प्रवक्ता निवडीसाठी युवक काँग्रेस घेणार ‘यंग इंडिया के बोल’ स्पर्धा

पुणे/नगर : माध्यमांसमोर पक्षाची बाजू मांडणारा प्रवक्ता हा संघटनात्मक महत्वाचा घटक असतो. अशा महत्वाच्या पदावरील प्रवक्ता निवडण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने ‘यंग इंडिया के बोल’ स्पर्धा घेण्यात येणार असून, त्यातून प्रवक्त्याची निवड केली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ते व स्पर्धेचे महाराष्ट्राचे प्रभारी ऋषिकेश मिरजकर यांनी दिली.

ऋषिकेश मिरजकर म्हणाले, “खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनात व भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अलावरू, तसेच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही. यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. माध्यमांसमोर पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रवक्त्यांची निवड स्पर्धेतून करण्याचा निर्णय प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी घेतला आहे. ‘यंग इंडिया के बोल’ उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले असून, त्यातून प्रवक्ता निवडला जाणार आहे. याच पद्धतीने राज्य व राष्ट्रीय प्रवक्त्यांची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी नि:पक्षपातीपणे निवड करू शकणाऱ्या पंचांची नेमणूक करण्यात येणार आहे.”

या स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच नगर येथे राज्याचे महसूलमंत्री व विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस व अहमदनगर ग्रामीणचे प्रभारी प्रथमेश आबनावे, अहमदनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, अहमदनगर ग्रामीणचे उपाध्यक्ष प्रशांत सिन्नरकर, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष सचिन घुले, राहता विधानसभा अध्यक्ष प्रसाद शेळके, श्रीगोंदा विधानसभेचे युवक अध्यक्ष संदीप वागस्कर, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल उगळे, तुषार पोटे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.