संभाजीराजेंवर शिवसेनेने अन्याय केला : रामदास आठवले

संभाजीराजेंवर शिवसेनेने अन्याय केला : रामदास आठवले

पुणे : “माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर शिवसेनेने अन्याय केला. भारतीय जनता पक्षाशी चर्चा केली असती, तर राजे भाजपचे उमेदवार म्हणून निवडणून आले असते. मात्र, ही राज्यसभा निवडणुक राजेंनी अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्धार केला होता. शिवाय, शिवसेनेने राजेंना दिलेला शब्द पाळला नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि शिवसेनेने धोका दिल्यानेच आज राजेंना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली,” अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, अशोक शिरोळे, सचिव महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, बाबुराव घाडगे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संगीता आठवले, शशिकला वाघमारे, हिमाली कांबळे, असीत गांगुर्डे, संजय सोनवणे, निलेश आल्हाट आदी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. शिवसेना-काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात अंतर्गत वाद आहेत. काँग्रेस पाठींबा ठेवायचा की नाही, यावर विचार करत आहे. काँग्रेसमध्ये धाडस दाखवत पाठींबा काढावा. आम्ही राज्यात सरकार बनवू. काँग्रेस खिळखीळी झाली आहे. काँग्रेसला नेता राहिला नाही. कॉग्रेसला अध्यक्ष मिळेना. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा सामना करणे काँग्रेसच्या आवाक्यात नाही.”

“भोंग्याबाबत राज ठाकरे यांची भूमिका अयोग्य आहे. अजान आणि प्रार्थना झाल्या पाहिजेत. निवडणूक आल्या की असे जातीय राजकारण होते. हे थांबायला हवे. रिपब्लिकन ऐक्य होईल असे वाटत नाही. कोणाच्याही नेतृत्वात ऐक्य झालेच, तर माझा गट त्यात नक्की सहभागी होईल. याआधीही अनेकदा ऐक्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो अयशस्वी राहिला आहे. समाजाने ऐक्य केले, तर आपण प्रत्येकाने एक पाऊल मागे येत त्यात सहभागी व्हायला हवे,” असे त्यांनी नमूद केले.

महापालिका निवडणुकांचा आढावा घेत आठवले म्हणाले, ‘महापालिका निवडणूक सोडत झाली आहे. २३ वॉर्ड शेड्युल कास्टसाठी सोडण्यात आले आहेत. रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत निवडणूक लढणार आहे.’ राज्यसभेची सहावी जागा आम्ही निवडून आणू. भाजपचा उमेदवार तेवढी मते मिळवण्यात यशस्वी ठरेल, असेही ते म्हणाले.

आपण संविधानाचे पालन करत शांततेचा मार्ग स्वीकारायला हवा. पंढरपूर मंदिर असो वा अनेक वाद असोत. धर्माच्या नावावर नवनवीन वाद काढू नयेत. शांततापूर्ण समाज निर्माण व्हावा, असेच आपले संविधान आहे.

काय म्हणाले आठवले…
– महाराष्ट्राला जीएसटीचा परतावा दिला आहे.
– अजूनही परतावा राहिला असल्यास त्यासाठी प्रयत्न करू.
– केंद्राच्या योजनाचे पैसे महाराष्ट्रात आलेत
– नॅशनल हेरॉल्डबाबत आलेल्या नोटिशीला राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी उत्तर द्यावीत.
– हार्दिक पटेलने भाजपमध्ये प्रवेश केलाय, याचा आनंद आहे.
– साकीनाका बलात्कार प्रकरणी कोर्टने पीडितेला न्याय दिला.
– न्यायालयाचे आभार मानतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *