ऋत्विक फाउंडेशन आयोजित कार्यक्रमात पं. सत्यशील देशपांडे यांनी उलगडले अंतरंग
पुणे : विविध श्रुती, त्यांची आंदोलने, श्रुती युक्त रागाविष्कार, श्रुती लावण्याचे वैविध्यपूर्ण प्रकार आणि त्यातून रंगलेली संध्याकाळ अशा स्वरमयी वातावरणात ‘ख्याल विमर्श’चे दुसरे सत्र रंगले. तरुणांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी वाढावी यासाठी कार्यरत ‘ऋत्विक फाउंडेशन’च्या वतीने ‘ख्याल विमर्श’च्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ गायक, संगीतज्ञ आणि लेखक पं. सत्यशील देशपांडे ख्याल गायकीचे अंतरंग उलगडले.
कोथरूडमधील ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पं. देशपांडे यांनी हिंदुस्तानी संगीतातील श्रुती या खास घटकाचे रंगतदार सप्रयोग विश्लेषण केले. फाउंडेशनचे प्रवीण कडले, चेतना कडले, सुदिप्तो मर्जीत आदी, व प्रेक्षागृहात अनेक तरुण गायक व संगितोपासक उपस्थित होते.
पंडितजींनी पहिल्या सत्रात, विविध ख्याल संगीतात नवनिर्मितीला व वैयक्तिक अभिव्यक्तीला कसा वाव मिळतो हे सप्रयोग दाखवलेच होते. हाच वाव श्रुतीच्या वैविध्यपूर्ण प्रयोगामुळे कसा वाढतो हा या दुसऱ्या सत्राचा विषय होता. हा अवघड विषय सांगण्यासाठी पंडितजींनी केलेल्या दरबारी कानडा, मिया मल्हार इत्यादी रागांच्या सादरीकरणाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. सृजन देशपांडे यांनी सह गायन, तर अभिजीत बारटक्के यांनी तबल्यावर साथ संगत केली.
“श्रुती चे ठराविक गणिती कंप संख्येच्या स्तरावरचे आकलन प्राथमिक ठरते, व तिला चिकटलेली नादमयता व मानवी संवेदनांना महत्त्व देऊनच तिच्या श्रीमंतीची पूर्ण जाणीव होऊ शकते” असे मत पंडितजींनी व्यक्त केले.