विविध संस्था, संघटना, सहकारी, विद्यार्थी, मित्र परिवाराकडून विलास चाफेकर यांना श्रद्धांजली
पुणे : समाजाने दुर्लक्षित केलेल्या वंचितांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा देत त्यांच्या आयुष्यात आनंद पेरण्याचे काम विलास चाफेकर यांनी केले. वेश्या वस्तीतील मुलांसाठी, समाजातील वंचित घटकांसाठी, हातगाडी व्यावसायिकांसाठी, कष्टकर्यांसाठी, आदिवासी, महिला, शहरी व ग्रामीण भागातील दीनदुबळ्यांसाठी आपले जीवन वेचले. चाफेकरांच्या निधनाने वंचितांच् या विकासासाठी झटणारा सच्चा कार्यकर्ता निवर्तला आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.
वंचित विकास, जाणीव संघटनेचे संस्थापक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, द्रष्टे विचारवंत विलास चाफेकर सर नुकतेच निधन झाले. संस्थेच्या वतीने आयोजित श्रद्धांजली सभेत विविध संस्था, संघटनाचे पदाधिकारी, चाफेकरांचे सहकारी, विद्यार्थी, मित्र परिवाराने त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. उद्योजक विलास जावडेकर, डॉ. अशोक निरफराके, ज्ञानदेव ठुबे, मेधा राजहंस, मनीषा सबनीस, यामिनी कुलकर्णी, संजय शंके, डॉ. श्रीकांत गबाले, अक्षय कुर्लेकर, तेजश्री म्हेत्रे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कर्वे रस्त्यावरील अश्वमेध हॉल येथे ही श्रद्धांजली सभा आयोजिली होती.
“समाजाने नाकारलेल्या निरागस व अस्तित्वहीन जीवांसाठी त्यांनी ‘नीहार’ उभारून अनेक पिढ्या घडवल्या. त्यातून उभे राहिलेले प्रगतीशील युवक आज मोठ्या संस्थांत काम करत आहेत, हीच त्यांच्या कार्याची पावती आहे. सखोल अभ्यास, सुस्पष्ट विचार, परखड मत मांडण्याचा त्यांचा स्वभाव होता. मूल्यांशी तडजोड न करता आलेल्या संकटांतून मार्ग काढण्याचे त्यांच्याकडे अनेक पर्याय असत. त्यांच्यामध्ये अहमपणा कधीच नव्हता. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद भरण्याचे त्यांचे कौशल्य भावणारे होते,” असे जावडेकर व डॉ. निरफराके यांनी सांगितले.
मेधा राजहंस म्हणाल्या, “चाफेकरांचे ‘रात्रंदिन आम्हा’ हे आत्मचरित्र प्रकाशित करताना फार जवळून त्यांचा सहवास लाभला. अतिशय स्थितप्रज्ञ, स्पष्ट, प्रामाणिक आणि हृदयस्पर्शी असे सरांचे व्यक्तिमत्व होते.” “आपल्या आयुष्यात अनेकदा वडिलकीची भूमिका सरांनी बजावली. त्यांचे विचार आणि संस्कार आम्हाला मिळाले. चाफेकर सर म्हणजे सर्वांवर निःस्वार्थ प्रेम करणारा ‘बाप’माणूस होते. त्यांचा सहवास जीवन समृद्ध करणारा आणि माणूस म्हणून जगण्याची शिकवण देणारा होता. माणुसकीची ही ज्योत आम्ही पुढे कायम तेवत ठेवू,” अशा भावना डॉ. गबाले, अक्षय व तेजश्रीने व्यक्त केल्या.
जाणीव संघटनेच्या वतीने संजय शंके यांनी श्रद्धांजली वाहिली. वंचित विकास संस्थेच्या कार्यवाह मीना कुर्लेकर म्हणाल्या, “शालेय जीवनापासून विद्यार्थी संघटना, ग्रामीण शेतमजुर, मुंबईतील वेश्यावस्ती, धारावी झोपड़पट्टी, आणीबाणीचा लढा, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ़ एज्युकेशनच्या प्रकल्पातून त्यांनी काम केले होते. समाजातील तळाच्या, शेवटच्या माणसापर्यंत सुखसमाधान पोहोचावे, यासाठी अखेरपर्यंत कार्यरत राहिले.”