विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कार्यात वसुधा परांजपे यांचे मोलाचे योगदान

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कार्यात वसुधा परांजपे यांचे मोलाचे योगदान

डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे प्रतिपादन; वसुधा परांजपे स्मृती पुरस्कारांचे वितरण

पुणे : “ग्रामीण भागातील मुलांसाठी आधारवड ठरलेल्या विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कार्यात वसुधा परांजपे यांचे मोलाचे योगदान होते. मूलगामी स्वरूपाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या स्मृतीनिमित्त पुरस्कार देण्याचा उपक्रम प्रेरक आहे,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले.

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी कार्यकारी विश्वस्त, व्यासंगी संपादक वसुधा परांजपे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे डॉ. कोतापल्ले यांच्या हस्ते वितरण झाले. समितीच्या फर्ग्युसन रस्त्यावरील आपटे वसतिगृहात झालेल्या सोहळ्यात वसुधा परांजपे यांचे पती ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्रा. प्र. ना. परांजपे, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, पुरस्कार निवड समितीच्या परिमल चौधरी आदी उपस्थित होते.

शैक्षणिक कार्याबद्दल मुंबई विद्यापीठातील जर्मन भाषेच्या प्राध्यापक व मराठी भाषा प्रसारक डॉ. विभा सुराणा यांना ‘वसुधा परांजपे स्मृती शिक्षणसेवा पुरस्कार’, तर सामाजिक कार्याबद्दल परिसर संस्थेचे प्रकल्प संचालक रणजित गाडगीळ यांना ‘वसुधा परांजपे स्मृती समाजसेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मानपत्र, पुष्प व रोख ५० हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी समितीमधील पाच विद्यार्थिनींना प्रत्येकी १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

डॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणाले, “मराठी भाषा समृद्ध असून, तिचा अधिकाधिक प्रसार होण्याची आवश्यकता आहे. आपण मराठी भाषा जगलो, तर ती टिकेल. सामाजिक कार्य सहज घडत नाही. त्यासाठी समर्पित भावना असावी लागते. विकासाच्या नेमक्या संकल्पना समजून घेत आपले कार्य निश्चित करायला हवे. समितीने ग्रामीण भागातील मुलांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना ‘माणूस’ घडविण्याचे काम हाती घेतले आणि गेली सहा दशके अविरतपणे ते सुरु आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत समिती आणि वसुधाताई यांच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे योगदान आहे.”

रणजित गाडगीळ म्हणाले, “पुरस्कारामुळे सामाजिक कार्याला प्रोत्साहन मिळते. ‘परिसर’चे सामाजिक कार्य अप्रत्यक्ष स्वरूपाचे आहे. त्याला हेरून समितीने हा पुरस्कार दिला, याचा आनंद आहे. शाश्वत, आरोग्यदायी आणि लोकाभिमुख विकासाचे काम संस्था करते. नागरी सुविधांच्या रचनेत सर्व घटकांचा विचार व्हायला हवा. वाहतूक व्यवस्था सुसूत्रित करण्यासाठी ‘परिसर’चे काम उपयुक्त ठरत आहे.”

डॉ. विभा सुराणा म्हणाल्या, “अन्य भाषिकांना मराठीचे शिक्षण देण्याच्या कार्यात अनेक सहकाऱ्यांचा हा सन्मान आहे. हे काम आणखी प्रभावी होण्यासाठी एखादी शिखर संस्था किंवा जर्मन, फ्रेंचसारखे मराठी विद्यापीठ असावे. सरकारी पातळीवरून मान्यता देण्याची व्यवस्था व्हावी.” प्रा. विजया देव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्र. ना. परांजपे यांनी पुरस्कारामागील उद्देश स्पष्ट केला व आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *