पुणे : पुण्यातील प्रसिद्ध वैद्य योगेश बेंडाळे यांची ‘सेंटर काउंसिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स’च्या (सीसीआरएएस) स्थायी वित्त समितीच्या (एसएफसी) सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. आयुर्वेदातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘सीसीआरएएस’च्या वार्षिक अर्थसंकल्पातून निधी वापरला जातो. या खर्चाला मंजूरी देण्यासाठी स्थायी वित्तीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यावर वैद्य बेंडाळेयांची निवड झाली आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत ‘सीसीआरएएस’ ही स्वायत्त परिषद आहे.
देशभरातील ३० नामांकित संस्था, तसेच प्रख्यात विद्यापीठे आणि रुग्णालयांमधील आयुर्वेदाच्या संशोधनाला चालना देणे, हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे. या संशोधनासाठी निश्चित आराखडा करणे, त्याचे नियोजन, समन्वय साधणे याची जबाबदारी या परिषदेवर आहे. आयुर्वेदिक औषधांचे प्रमाणीकरण, औषधनिर्माण शास्त्रातील संशोधन, क्लिनिकल रिसर्च अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरदेखील ही संस्था कार्य करते. प्राचीन वैद्यकशास्त्र असलेल्या आयुर्वेदाला आधुनिक वैद्यकीय परिमाणाच्या आधारावर लोकांपर्यंत पोचविणे ही काळाची गरज आहे. रोगनिदान, रोग प्रतिबंध, रोगांवर उपचार या सर्वांमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यावर या परिषदेचा भर असतो.