करण जोहर व मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते उषा काकडे प्रॉडक्शनच्या लोगोचे अनावरण

करण जोहर व मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते उषा काकडे प्रॉडक्शनच्या लोगोचे अनावरण

 ‘विकी’ या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा; चित्रपट सृष्टीतील दिग्गजांकडून उषा काकडे यांचे निर्मिती क्षेत्रातील पदापर्णाबद्दल कौतुक

पुणे : बांधकाम व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उषा काकडे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले असून, त्यांच्या ‘उषा काकडे प्रॉडक्शन्स’च्या लोगोचे अनावरण प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर व फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते झाले. उषा काकडे प्रॉडक्शन निर्मित ‘विकी : द फुल ऑफ लव्ह’ या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणाही दोघांच्या हस्ते यावेळी क्लॅपिंग करून झाली.
 

मुंबईतील ताज लँड्स एंड येथे नुकत्याच झालेल्या या सोहळ्यात शर्मिला ठाकरे, अभिनेत्री इशा कोप्पीकर, सोनाली कुलकर्णी, रिंकू राजगुरू, स्मिता गोंदकर, तनिषा मुखर्जी, गौहर खान, लक्ष्मी नारायण त्रिपाठी, अभिनेता अभिजीत खांडकेकर, उद्योजक संजय काकडे, निर्माती उषा काकडे, ‘विकी’ चित्रपटाचे दिग्दर्शक तेजपाल वाघ, कलाकार हेमल इंगळे व अभिनेता सुमेध मुदगळकर, अशोक पंडित यांच्यासह हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती होती.

करण जोहर म्हणाले, “चित्रपट निर्मितीसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात उषा काकडे यांचे स्वागत व अभिनंदन करतो. माझा त्यांना नेहमीच पाठिंबा राहील. त्यांच्याकडून अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मिती होईल. त्यांच्या पहिल्याच चित्रपटाचे नाव ‘विकी’ असून, आजवर ते नाव अनेकांसाठी ‘लकी’ ठरलेले आहे. मी मराठी चित्रपटांचा मोठा फॅन असून, या मोठ्या बॅनरखाली होत असलेल्या मराठी चित्रपटाचे क्लॅपिंग माझ्या हस्ते होत आहे, याचा आनंद वाटतो. मराठी चित्रपट जगभरात नावलौकिक मिळवत आहेत. महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत राहत असल्याचा मला अभिमान वाटतो.”


मनीष मल्होत्रा यांनी काकडे यांच्या या नव्या उपक्रमाचे कौतुक केले. बांधकाम व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान दिलेल्या उषा काकडे निर्मिती क्षेत्रातही आपला ठसा निश्चितपणे उमटवतील. अनेकांची मने जिंकण्याचा उषा काकडे यांचा प्रवास सुरु झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

उषा काकडे म्हणाल्या, “चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याचे स्वप्न खूप आधीपासून पाहिले होते. सामाजिक क्षेत्रात कार्य करताना आपल्याला जर अनेक लोकांपर्यंत योग्य मेसेज पोहोचवायचा असेल, तर चित्रपट हा एक उत्तम पर्याय आहे. अनेक नवनवीन समाजोपयोगी संदेश देणारे चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश राहील. या नवीन प्रवासात माझ्या जवळचे स्नेही मला खूप प्रेम व शुभेच्छा देत आहेत. करण जोहर आणि मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते या प्रॉडक्शन हाऊसचा शुभारंभ होतोय, ही आनंदाची गोष्ट आहे. ‘विकी : द फुल्ल ऑफ लव्ह’ असून हा चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”


बांधकाम क्षेत्रात गेल्या १८ वर्षांपासून कार्यरत असलेल्या उषा काकडे ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्याही संस्थापक आहेत. फाउंडेशनच्या माध्यमातून 
आजवर पाच लाख मुलांना सुरक्षित व असुरक्षित स्पर्शाचे ज्ञान, ८० हजार मुलांची मोफत दंततपासणी, एक लाख १० हजार मुलांचे डोळे तपासणी व शस्त्रक्रिया असे उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांसाठी युनिसेफ संस्थेसोबत भागीदारी करण्यात आलेली आहे. चित्रपटांमध्ये परिवर्तनाची शक्ती लक्षात घेऊन उषा काकडे यांनी गेली तीन वर्षे चित्रपट क्षेत्राचा सखोल अभ्यास केला व त्यानंतर या क्षेत्रात निर्माता म्हणून पदार्पण करण्याचे निश्चित केले. त्यांचे हे पाऊल त्यांच्यातील समर्पणाचे प्रतीक आहे. येत्या काळात अनेक चांगल्या कथा स्क्रीनवर आणण्यात त्यांचे योगदान राहील.

शर्मिला ठाकरे, संजय काकडे यांनीही उषा काकडे यांच्या कार्याचे व पदार्पणाचे कौतुक केले. अभिनेता अभिजीत खांडकेकर यांनी 
सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *