‘एससीएचएमटीटी’ला ‘आकोही प्रेस्टिजीएस स्टार ग्रेडेशन’ प्रमाणपत्र

‘एससीएचएमटीटी’ला ‘आकोही प्रेस्टिजीएस स्टार ग्रेडेशन’ प्रमाणपत्र

सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम ठरले भारतातील पहिले ३.५ स्टार ‘आकोही’ रेटेड महाविद्यालय

पुणे : एशियन कंट्रीज चेंबर ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतर्फे (आकोही) सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझमला (एससीएचएमटीटी) ‘आकोही प्रेस्टिजीएस स्टार ग्रेडेशन’ प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रातील ‘आकोही’चे सर्वोत्कृष्ट ३.५ स्टार रेटिंग मिळालेले भारतातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. याआधीही ‘सूर्यदत्त’ला सर्वोत्कृष्ट हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट म्हणून विविध नामांकित संस्थांच्या वतीने गौरवान्वित केलेले आहे.
 
 
‘आकोही’चे एशियन चेअरपर्सन डॉ. सानी अवसरमल यांनी संस्थेकडे स्टार रेटिंगचे हे प्रमाणपत्र सुपूर्त केले. प्रसंगी ‘एससीएचएमटीटी’चे प्रमुख प्रा. अतुल देशपांडे, प्रीती चॅटर्जी आदी उपस्थित होते. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया यांनी या यशाबद्दल हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.
 
डॉ. सानी अवसरमल म्हणाले, “पाककला (कलिनरी) आणि आतिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. यामध्ये यशस्वी होण्यासाठी सातत्य, नवकल्पना, सर्जनशीलता आणि गुणवत्ता लागते. हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या गुणवत्तेचे वर्गीकरण करण्यासाठी कलिनरी आयडी किंवा स्टार ग्रेडेशन अभियान ‘आकोही’ने हाती घेतले आहे. भारतातील पाककला व हॉस्पिटॅलिटी शिक्षणाची गुणवत्ता व उत्कृष्टता प्रमाणित करण्याचा उद्देश यामागे आहे.” 
 
“यामध्ये उद्योग व राष्ट्रीय विकासात संस्थांचे योगदान, अभ्यासक्रमाची व्यापकता, उच्च तंत्रज्ञानाच्या शिक्षण पद्धती आणि त्यांचे अनुकूलन, संस्थेची गुणवत्ता, पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, किचन, विद्यार्थी-शिक्षकांसाठीच्या सुविधा, शिक्षकांची क्षमता व त्यांचे शैक्षणिक निकष; प्लेसमेंट्स, माजी विद्यार्थ्यांचे जाळे, उद्योगांशी संपर्क, चर्चासत्रे, सीएसआर उपक्रमांवर आधारित संस्थेचे मूल्यांकन करण्यात आले. ‘सूर्यदत्त’चे प्लेसमेंट रेकॉर्ड चांगले असून, देशांतर्गत व परदेशांत प्लेसमेंट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. माजी विद्यार्थ्यांचा संस्थेशी चांगला संपर्क असून, सीएसआरमध्ये सहभाग, उद्योगांशी संपर्क, नेटवर्किंग, उद्योजकतेसाठी होणारे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. या सर्व गोष्टींचे अवलोकन करून या प्रमाणपत्रासाठी ‘सूर्यदत्त’ची निवड करण्यात आली आहे,” असे डॉ. सानी अवसरमल म्हणाले.
 
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित ‘एससीएचएमटीटी’मध्ये पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यासह अनेक अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम असून, त्यासाठी लंडन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग (एलएपीटी), अमेरिकन हॉटेल अँड लॉजिंग एज्युकेशन इन्स्टिट्यूट यांसारख्या नामांकित संस्थांशी ‘एससीएचएमटीटी’चा सामंजस्य करार केलेला आहे. उद्योगभेटींमुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळते. दरवर्षी साधारणपणे १० टक्के विद्यार्थी उद्योजक होतात. २० टक्के विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय, तर ६५ ते ७० टक्के विद्यार्थ्यांना भारतातील कंपन्यात प्लेसमेंट मिळते. मेरियट, ओबेरॉय, हयात, नोवोटेल, ऑर्चिड, ली मेरिडियन यांसारख्या हॉटेलांत, तसेच सिंगापूर, अमेरिका, न्यूझीलंड आदी देशांत विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालेली आहे.”
 
“गेल्या दोन दशकाहून अधिक काळात ‘सूर्यदत्त’ने हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळण्यासाठी सूर्यदत्त, तसेच अन्य महाविद्यालयातील नियमित जॉब फेअर, मिसळ महोत्सव, चिक्की वाटप उपक्रम, कोरोना काळात विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ बनवणे व वाटप करणे असे उपक्रम सीएसआर अंतर्गत राबविण्यात येतात. मुलांना उद्योजकतेची प्रात्यक्षिक अनुभव दिले जातात. ४० पेक्षा अधिक देशांत मुलांनी इंटर्नशिप केल्या आहेत. यासह विद्यार्थ्यांना फिटनेस, ब्युटी वेलनेस, जिम, एअरहोस्टेस असे विविध अल्पकालीन अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामुळे या मुलांना मल्टीटास्किंग जमते. तसेच यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढतो. परिणामी, सूर्यदत्तचे विद्यार्थी अनेक कंपन्यात टिकून राहतात,” असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
 
उद्योजकीय कौशल्ये विकसित करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीविषयी जागरूकता आणणे ही हॉटेल मॅनेजमेंट संस्थेची व्यावसायिक आणि नैतिक जबाबदारी आहे. याला अनुसरून सूर्यदत्त काम करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आव्हानात्मक संधी मिळवण्याच्या इच्छेने विद्यार्थ्यांनी सूर्यदत्त संस्थेला भेट देऊन येथील शिक्षणाचा अनुभव व लाभ घ्यायला हवा, असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *