पुणे : “विद्यार्थी सहायक समितीचे काम खूप वेगळे आहे. विद्यार्थ्यांसाठी काम करतानाच सामाजिक जाणिवेतून अन्नसेवा, वृक्षसंवर्धन असे उपक्रम राबविले तर युवा पिढीला वेगळा संस्कार मिळतो. वड, पिंपळ, चिंच अशा वृक्षांची लागवड केल्याने पर्यावरण संतूलन उत्तम राहण्यास मदत होते. शिवाय ही झाडे दीर्घायुषी असतात. अशा उपक्रमांतून आपला महाराष्ट्र आणि भारत हिरवागार होण्यास मदत होईल,” असे मत खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे सीईओ प्रमोदकुमार यांनी व्यक्त केले.
विद्यार्थी सहाय्यक समिती आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने समिती आशीर्वाद वृक्ष योजनेअंतर्गत बोर्डाच्या आवारात आणि रेंजहिल्स परिसरात देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी देणगीदार दत्ताजी गायकवाड, विनायक खंडकर, किशोरी खंडकर, नंदाताई दामले, यशवंतराव खैरे, समितीचे अध्यक्ष व जेष्ठ उद्योजक प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त संजय अमृते, तुषार रंजनकर, जिभाऊ शेवाळे, मनोज गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष राजू इंगळे, संतोष घारे, नंदकुमार तळेकर, सोपान गोंटला, समितीचे पर्यवेक्षक व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रतापराव पवार म्हणाले, “चांगल्या विचारांचे लोक आणि संस्था एकत्र आल्यावर अनेक चांगली कामे उभी राहतात. आजचा वृक्षलागवडीचा कार्यक्रमही त्याचाच एक भाग आहे. देणगीदारांचा विश्वास आणि निरलसपणा यामुळे हे शक्य होत आहे. तुम्ही आमच्यासोबत असल्याने अनेक कामे पुढे जाण्यास सोयीचे होईल.”