लॅप्रोस्कोपी तंत्रज्ञानाद्वारे ‘युरोकूल’मध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

लॅप्रोस्कोपी तंत्रज्ञानाद्वारे ‘युरोकूल’मध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

डॉ. ज्योत्स्ना व डॉ. संजय कुलकर्णी यांची माहिती; जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त महिनाभर विनामूल्य तपासणी व जागृती अभियान

पुणे : ओपन सर्जरी किंवा कोणतीही चिरफाड न करता लॅप्रोस्कोपिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून  मूत्रपिंड दात्याकडून काढून त्याचे प्रत्यारोपण ओपन पद्धतीने करण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती युरोकूल-कुलकर्णी युरो सर्जरी इन्स्टिट्यूटचे (युरोकूल रुग्णालय) संस्थापक व जगप्रसिद्ध युरॉलॉजिस्ट डॉ. संजय कुलकर्णी व पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.

लॅप्रोस्कोपी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ओपन सर्जरीविना मूत्रपिंड दात्याचे मूत्रपिंड लॅप्रोस्कोपी पद्धतीने काढून ते ओपन पद्धतीने रुग्णावर बसवण्याची शस्त्रक्रिया या दांपत्याने 2000 मध्ये पुण्यात सुरू केली पुण्यातील युरोकूल-कुलकर्णी युरो सर्जरी इन्स्टिट्यूटमध्ये ही याच प्रकाराने दोन यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेवेळी या टीमसह बाणेर-बालेवाडी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे उपस्थित होते. किडनी देणारे व घेणारे चौघेही रुग्ण गुगल मीटद्वारे पत्रकार परिषदेत सहभागी झाले.

डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांच्या नेतृत्वात डॉ. संजय कुलकर्णी, नेफरोलॉजिस्ट डॉ. सुहास मोंढे, डॉ. श्रुती डांगे, युरोसर्जन डॉ. पंकज जोशी, डॉ. श्रेयस भद्रनवार, डॉ. अमित होसमणी, डॉ. उदय चंदनखेडे, डॉ. आदर्श कुरी, डॉ. अपूर्व आनंद, डॉ. अमेय तळपल्लीकर, डॉ. मंजुश्री परदेशी, भुलतज्ञ डॉ. सुधीर फडके, नर्सिंग विभागाच्या सौम्या कुलकर्णी या टीमने या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी केल्या.

डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले, “डॉक्टर असलेल्या वडिलांची मूत्रपिंड मुलाला व नणंदेची मूत्रपिंड भावजयीला असा भावनिक बंध जोडणाऱ्या या दोन मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत्या. सध्याच्या युगात नातेसंबंध दृढ करणारी ही आदर्श व कुटुंबवत्सल घटना आहे. कोणत्याही रक्तस्रावाशिवाय झालेल्या या शस्त्रक्रियेनंतर दोन्ही रुग्णांना उत्तम स्थितीत तिसऱ्या दिवशी घरी पाठवण्यात आले. आज या चौघांचेही स्वास्थ्य उत्तम आहे. सततचे डायलिसिस टाळण्यासाठी मूत्रपिंड प्रत्यारोपण महत्वपूर्ण ठरते. ही शस्त्रक्रिया सहज झाल्याने रुग्णांना लवकर बरे होण्याचा विश्वास मिळाला आहे.”

मूत्रपिंड प्रत्यारोपण टीमचा सत्कार
युरोकूल रुग्णालयातील या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मूत्रपिंड देणारे-घेणारे वडील डॉ. पोपट साठे व डॉ. तुषार साठे, नणंद श्यामला कुलकर्णी व भावजय सुकन्या कुलकर्णी यांच्यासह सर्व टीमचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांच्या हस्ते सर्वांचे कौतुक करण्यात आले. मूत्रपिंड दाता व शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

जागतिक मूत्रपिंड दिवसानिमित्त जागृती
मूत्रपिंडाच्या आजाराबाबत जागृतीसाठी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक मूत्रपिंड दिवस जगभर साजरा केला जातो. मूत्रपिंडे ही शरीरातील अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत. यांची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे. समाजात याविषयी मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यासाठी हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो. युरोकूलमध्ये संपूर्ण महिनाभर मूत्रपिंड आजारांची विनामूल्य तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे, असे डॉ. सुहास मोंढे यांनी सांगितले.

‘युरोकूल’ची सामाजिक बांधिलकी
‘युरोलॉजी’ व ‘नेफरोलॅाजी’साठी समर्पित बाणेर येथे १०५ बेडचे ‘युरोकुल’ भारतातील तिसरे मानांकित हॉस्पिटल आहे. मूत्रमार्गाच्या विकारांवरील अद्ययावत व सुसज्ज सेवा एकाच छताखाली २४ तास उपलब्ध आहेत. रुग्णांवर परवडणाऱ्या किंमतीत शस्त्रक्रिया, तसेच बिल भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णाला परत पाठवले जात नाही, हे येथील वैशिष्ट्य आहे. या सामाजिक बांधिलकीमुळे देश-विदेशातील रुग्णांमध्ये ‘युरोकुल’ आपलेसे झाले आहे. जगातील सुमारे ५० देशांमध्ये जाऊन प्रात्यक्षिकांसह ‘युरेथ्रोप्लास्टी’ शस्त्रक्रिया करणारे डॉ. संजय कुलकर्णी आणि पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी हे ‘युरोकुल’चे प्रमुख आहेत. कुलकर्णी दाम्पत्याने सुरु केलेल्या या रुग्णालयाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे.

 
 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *