विद्यार्थिनी वसतिगृहाचे भूमिपूजनावेळी दुबईस्थित प्रसिद्ध उद्योजक विनोद जाधव यांचे प्रतिपादन
पुणे : “शिक्षणामुळे समाज, देश घडत असतो. समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना शिक्षणाची संधी देण्याचे काम व्हायला हवे. आपल्या जडणघडणीत समाजातील दातृत्वाचा सहभाग असतो. त्यामुळे आपणही त्या समाजाप्रती देणे लागतो, या भावनेतून शैक्षणिक प्रकल्पांना शक्य तितकी मदत करायला हवी. विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्य आदर्शवत व पथदर्शी असल्याने या संस्थेसोबत काम करण्यात आनंद मिळतो,” असे प्रतिपादन दुबईस्थित प्रसिद्ध उद्योजक विनोद जाधव यांनी केले.
ग्रामीण भागातील गरीब, गरजू व हुशार विद्यार्थ्यांना आधारवड असलेल्या विद्यार्थी साहाय्यक समितीच्या विद्यार्थिनी वसति गृहाचे भूमिपूजन लजपतराय विद्यार्थी भवन, शिवाजी हौसिंग सोसायटी जवळ, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे सोमवारी त्यांच्या हस्ते झाले. प्रसंगी मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, आत्मजा फाउंडेशनच्या संस्थापक प्रीती राव, समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, उद्योजक विजय कदम आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक नितीनभाई कारिया यांनी या प्रकल्पासाठी अडीच कोटी रुपयांची देणगी यावेळी जाहीर केली. पुण्यातील प्रसिद्ध आरसीसी कन्सल्टन्ट जी. ए. भिलारे यांनी प्रकल्पाच्या आरसीसी कंसल्टंसीचे काम विनामूल्य करण्याचे मान्य केले, तर अनेकांनी एका खोलीसाठी १० लाख रुपयेप्रमाणे देणगी दिली. १० लाखांची देणगी देणाऱ्यांचे नाव खोलीला देण्यात येणार असून, ही देणगी पुढील तीन वर्षात टप्प्याटप्प्याने देता येणार असल्याचे समितीचे खजिनदार संजय अमृते यांनी नमूद केले.
विनोद जाधव म्हणाले, “शून्यातून कोणीही निर्माण होत नसतो. प्रत्येकाच्या निर्मितीत एखाद्या व्यक्तीचा, संस्थेचा, समाजाचा सहभाग असतो. याची जाणीव ठेवत आपणही त्या समाजाला परत दिले पाहिजे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठे काम उभारण्याची गरज असून, प्रत्येकाने आपापल्या परीने यामध्ये योगदान द्यावे. समितीच्या या वसतिगृहामुळे २५० मुलींना चांगले शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच अहमदनगर येथे प्रस्तावित वसतिगृहामुळे १२० मुलामुलींची सोय होतेय, याचे समाधान आहे.”
प्रतापराव पवार म्हणाले, “कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय विद्यार्थी साहाय्यक समिती गेली ६७ वर्षे हजारो मुलांना घडवत आहे. सध्या ७५० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. मात्र, किमान हजार विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार होता. त्यादृष्टीने आणखी २५० मुलींची सोय होईल, असे वसतिगृह दानशूरांच्या सहभागातून उभे राहत आहे. माजी विद्यार्थ्यांचा या कामात सहभाग वाढतोय, याचा आनंद वाटतो. अनेक व्यक्ती, संस्था सोबत येत असल्याने समाजासाठी समाजाच्या साहाय्याने हे काम प्रभावीपणे होत आहे.”
भाऊसाहेब जाधव म्हणाले, “मराठवाडा मित्र मंडळ आणि विद्यार्थी साहाय्यक समिती या संस्थांचे कार्य सारखेच आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून पुण्यात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीकरिता आम्ही एकत्रित काम करत आहोत. प्रस्तावित मुलींच्या वसतिगृहातील एक मजला मराठवाडा मित्र मंडळ संस्था दत्तक घेणार आहे. त्यातून जवळपास ७५ मुलींची सोय होईल.” प्रीती राव यांनी समितीच्या पारदर्शक कामामुळे प्रभावित झाले असून, मुलींच्या शिक्षणासाठी जास्तीतजास्त मदत करणार असल्याचे नमूद केले.
तुकाराम गायकवाड यांनी प्रास्ताविकात समितीच्या कार्याची माहिती दिली. आर्किटेक राजेश पाटील यांनी नवीन वसतिगृहाच्या आराखड्याचे सादरीकरण केले. सुप्रिया केळवकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.