समाजस्वास्थ्यासाठी संस्काराच्या स्मृती जपणारे उपक्रम महत्वपूर्ण

समाजस्वास्थ्यासाठी संस्काराच्या स्मृती जपणारे उपक्रम महत्वपूर्ण

स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे प्रतिपादन; स. गो. बर्वे चौकातील भुयारी मार्ग, पदपथाचे नामकरण

पुणे : “मन हे आपल्या सर्व क्रियांचे प्रेरक असते. त्यामुळे मनाला उत्तम संस्कार प्राप्त करण्यासाठी पुण्यश्लोक व्यक्तींचा आदर्श ठेवला पाहिजे. एकमेकांना घडवत पुढे जाण्याची आज गरज आहे. एकीकडे समाजाचे स्वास्थ्य बिघडत असताना संस्काराच्या स्मृती जपण्याचे असे उपक्रम आशादायी वाटतात, “असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी मंदिर न्यास, अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले.

कार्यक्षम नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना गजानन एकबोटे यांच्या प्रयत्नांतून पुणे महानगर पालिकेच्या सहकार्याने जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौकातील भुयारी मार्गाचे ‘सद्गुरू श्री मोरया गोसावी भुयारी मार्ग’ आणि रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर येथील श्री पुण्य गणेश मंदिर ते किणीकर चौक या रस्त्याचे संघ स्वयंसेवक ‘स्वर्गीय दादासाहेब एकबोटे पथ’ असे नामकरण स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विशेष सहकार्य लाभले.

याप्रसंगी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, पुणे महानगर पालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त विश्राम देव, समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, डॉ. नंदकिशोर एकबोटे, समृद्धी एकबोटे, प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. श्यामकांत देशमुख, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त अक्षय गोडसे, शिल्पकार विवेक खटावकर, पुणे शहर भाजपचे सरचिटणीस दत्तात्रय खाडे, उपाध्यक्ष सुनील पांडे, शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, सरचिटणीस गणेश बगाडे आदी उपस्थित होते.

स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले, “सद्गुरू मोरया गोसावी महाराज यांचे कार्य, गणेशभक्ती अपार आहे. आयुष्यभर मंगलमूर्तीची आराधना करत समाजासमोर दृढ भक्तीचा आदर्श ठेवला. ‘मंगलमूर्ती मोरया’ हा उद्घोष त्यांनी दिला. याच प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुण्यात कसबा गणेशाची प्रतिष्ठापना करून राष्ट्राला उभे करण्याची प्रेरणा दिली. विद्येचे माहेरघर पुणे देवदेवतांची भक्ती करण्यातही अग्रेसर आहे.”

“निःस्वार्थ भावनेने समाजाची, हिंदू धर्माची सेवा करत पिढी घडवण्याचे काम संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दादासाहेब एकबोटे यांनी केले. पुण्याने अनेक गोष्टीत देशाला मार्ग दाखवला आहे. आपण प्रत्येकाने आपापल्या परीने राष्ट्रभक्तीचे कार्य केले पाहिजे. पणती आसमंताला प्रकाशित करते, त्याप्रकारे या दोन नामकरणामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल,” अशा शब्दात स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी एकबोटे यांच्या कार्याचा गौरव केला.

प्रा. डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, “१८६ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या, संजीवन समाधी घेतलेल्या मोरया गोसावी यांचे भुयारी मार्गाला, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि थोर समाजसेवक दादासाहेब एकबोटे यांचे रेव्हेन्यू कॉलनीतील रस्त्याला नाव देणे आणि त्याचे उद्घाटन स्वामी गोविंददेव यांच्या हस्ते होणे हा दुग्धशर्करा योग आहे. या तिघांच्याही प्रेरणेतून यापुढेही आणखी भरीव कार्य करता येईल.”

हेमंत रासने, मिलिंद एकबोटे यांनीही मनोगते व्यक्त केली. प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे यांनी सूत्रसंचालन केले. मंगेश नलावडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *