पर्यावरण, सामाजिक कार्यात योगदान देण्याची वृत्ती जोपासावी

पर्यावरण, सामाजिक कार्यात योगदान देण्याची वृत्ती जोपासावी

प्रदीप भार्गव यांचा विद्यार्थ्यांना सल्ला; ‘एआयटी’च्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त जीवनगौरव पुरस्कार प्रदान

पुणे: “आयुष्यात बदल घडविण्यासाठी चांगले शिक्षण, संस्कार घेणे महत्वाचे आहे. प्रगती करताना भवतालच्या लोकांच्या आयुष्यात आनंद पेरण्यासाठी काम केले पाहिजे. त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. आपण पर्यावरण संरक्षण, सामाजिक आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात योगदान देण्याची वृत्ती जोपासावी,” असा सल्ला पर्सिस्टंट सिस्टिम्सचे स्वतंत्र संचालक आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) माजी अध्यक्ष प्रदीप भार्गव यांनी विद्यार्थ्यांना दिला.

दिघी येथील आर्मी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) २८व्या वर्धापन दिनानिमित्त प्रदीप भार्गव यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदर्श उद्योजक पुरस्कार पिनॅकल इंडस्ट्रीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) सुधीर मेहता यांना, तर आदर्श युवा उद्योजक पुरस्कार अकॉप्स सिस्टिम्सचे सहसंस्थापक विजेंदर यादव यांना प्रदान करण्यात आला.

प्रसंगी सदर्न कमांडचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन, लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया ऑनलाईन सहभागी झाले होते. तर ‘एआयटी’च्या कॅम्पसमध्ये झालेल्या कार्यक्रमाला लेफ्ट. जनरल (निवृत्त) सुदर्शन हसबनीस, ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर अभय भट, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील आदी उपस्थित होते.

स्वागतिका साहू हिला ‘द चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऑलराउंडर बेस्ट स्टुडंट’चा पुरस्कार मिळाला. सौम्यकांता खाटुआ, रिषभ कुमार सिंग, विशाल नायक, स्वागतिका साहू यांना ‘कमांडर इन चीफ ट्रॉफी’ पारितोषिकाने, अक्षय शर्मा याला राजपूत रेजिमेंट बेस्ट ट्रॉफी फॉर इनोव्हेशन, अमतुल मस्वारा हिला खेळासाठी जी. राजशेखर मेमोरियल पुरस्कार, तर गरिमा देवी हिला ‘बेस्ट लायब्ररी युजर अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले. डॉ. सीमा तिवारी यांना सर्वोत्कृष्ट शिक्षक, रोहन सोनावणे यांना ‘बेस्ट टेक्निकल स्टाफ’, तर सुभेदार बी. प्रधान यांना ‘बेस्ट नॉन टिचिंग स्टाफ’ पारितोषिक प्रदान करण्यात आले.

लेफ्ट. जनरल जे. एस. नैन म्हणाले, “कोरोनानंतर जग बदलत आहे. अशावेळी ‘एआयटी’मधील विद्यार्थी विविध क्षेत्रात इनोव्हेशन, स्टार्टअप सुरु करत आहेत. आम्ही ‘एआयटी’तील विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया अशा उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. संशोधनावर भर दिला जात आहे. कोरोनाच्या कठीण काळातही येथील विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट, विविध स्पर्धा आणि ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपातील उपक्रमात मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.”

लेफ्ट. जनरल अरविंद वालिया म्हणाले, “शिक्षणाचे नवे तंत्र विद्यार्थी, शिक्षकांनी सहज आत्मसात केले. आता कोरोनाचा प्रभाव कमी होतोय. लसीकरण झाले आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यात प्रत्यक्ष महाविद्यालय सुरु होईल. विद्यार्थ्यांनी इंटरनेट ऑफ थिंग्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी यासह बहुशाखीय ज्ञान घेण्यावर भर द्यावा. पुढील काळात या क्षेत्रात मोठी संधी आहे. संशोधन, इनोव्हेशन आणि स्टार्टअपवर विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करावे.”

सुधीर मेहता म्हणाले, “भारतासारख्या महान देशात जन्मलो आहोत. तुमचा जन्म देशसेवा करणाऱ्या कुटुंबात झाला आहे. शिक्षणासह मूल्यांचे, संस्काराची बीजे पेरण्याचे काम ‘एआयटी’मध्ये होत आहे. कोरोनामध्ये आपल्या देशाने एकीचे बळ दाखवत एकमेकांना आधार देण्याचे काम केले. इतर देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाचा सामना निकराने केला. उद्योग क्षेत्र पुन्हा एकदा जोमाने उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. लस बनवणाऱ्या भारतीय कंपनीने मानवतेच्या भावनेतून स्वस्तात लस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.”

विजेंदर यादव म्हणाले, “या सन्मानाबद्दल ‘एआयटी’ परिवाराचे आभार मानतो आणि ‘अकॉप्स सिस्टीम्स’च्या टीमला हा सन्मान समर्पित करतो. त्यांचे, कुटुंबियांचे योगदान मोलाचे आहे. आयुष्यात आणखी बरेच काही मिळवायचे असून, आपल्या भवतालच्या लोकांना आनंद देणारे काम करायचे आहे. चांगल्या कामातून आम्ही संस्थेचे नाव आणखी उंचीवर नेऊ.”

ब्रिगेडियर अभय भट यांनी संस्थेच्या गेल्या वर्षभरातील वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले, तर अभय भट यांनी आभार मानले. यावेळी टाटा, झेडएस असोसिएट, पर्सिस्टंट फाउंडेशन, हॉरीझॉन ग्रुप, बडवे ग्रुप, हॅश मॅप, उडचलो ग्रुप, इंडियन एक्सप्रेस यांनी उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रायोजित केलेली पारितोषिके विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी लष्करात यावे : लेफ्ट. जनरल (नि.) सुदर्शन हसबनीस
विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी मिळाव्यात, यासाठी ‘एआयटी’ने लष्कर, नौदल आणि हवाईदल यांच्यासह विविध मान्यवर संस्था, विद्यापीठे यांच्याशी सामंजस्य करार करावेत. संरक्षण क्षेत्रातील नेमक्या समस्या ओळखून त्यावर उपाय विकसीत करण्याचे काम विद्यार्थ्यांनी करावे. संशोधन, इनोव्हेशन, स्टार्टअप यातून भारताला, लष्कराला आत्मनिर्भर करण्यावर आपण भर दिला पाहिजे. आपण सर्व लष्करी अधिकारी-कर्मचाऱ्यांची मुले-मुली आहोत. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील संधी ओळखत विद्यार्थ्यांनी लष्करात यावे. आपली मुलेही देशसेवेत आल्याचे पाहून आई-वडिलांना नक्कीच अभिमान वाटेल, असे प्रतिपादन लेफ्ट. जनरल (निवृत्त) सुदर्शन हसबनीस यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *