पुणे : किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडने काळाचा वेध घेत व्यावसाय विस्तारासाठी ‘मिशन लिमिटलेस’ हाती घेतले आहे. या उपक्रमांतर्गत किर्लोस्कर ग्रुपच्या नव्या लोगोसह अवांते स्पेसेस आणि अर्का फिनकॅप या बिगर बँकिंग फायनान्स कंपनी (एनबीएफसी) क्षेत्रात उतरत असून, या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाईल, अशी माहिती किर्लोस्कल ऑइल इंजिन्सचे कार्यकारी अध्यक्ष अतुल किर्लोस्कर आणि किर्लोस्कर न्यूमॅटिकचे कार्यकारी अध्यक्ष राहुल किर्लोस्कर यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत दिली.
त्याचबरोबर थ्रीडी प्रिंटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, डिजिटायझेशन, आर्टिफिशियल इंटेलिजेंस यांसारख्या नवतंत्रज्ञान आणि प्रक्रियांचा अंगीकार केला जाणार आहे. यामुळे किर्लोस्कर ऑइल इंजिन, किर्लोस्कर चिलर्स, किर्लोस्कर न्यूमॅटिक, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज आणि किर्लोस्कर इंडस्ट्रीज यामध्ये क्रांतिकारक बदल होणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले. ऑनलाईन स्वरूपात झालेल्या पत्रकार परिषदेत किर्लोस्कर इंडस्ट्रीजचे महेश छाब्रिया हेही उपस्थित होते.
अतुल किर्लोस्कर म्हणाले, ”गेल्या १३० वर्षांत किर्लोस्कर समूहाने उद्योग क्षेत्राच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. समूहाचा विस्तार करताना आता अवांते स्पेसेसच्या माध्यमातून रियल इस्टेट आणि अर्का फिनकॅपच्या माध्यमातून फायनान्स क्षेत्रात उतरत आहोत. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कार्यरत किर्लोस्कर समूह पुण्यातून बांधकाम व्यवसायाची सुरुवात करणार असून, २० लाख स्केअर फूट जागा विकसित केली जाणार आहे. बी२बी व्यवसायासह बी२सी विभागातही अधिक सक्रिय होण्याचा प्रयत्न आहे. नव्या लोगोमध्ये मनुष्य केंद्रीभूततेचे घटक आणि भविष्यासाठीची सुसज्जता आहे आणि रंगांमधून मागील १३० वर्षांपासून या नावाने जपलेला आणि त्यांनी ज्यांच्या स्वप्नाला स्पर्श केला आहे. नावीन्यपूर्ण विचारसरणी, सहानुभूती, सहयोग, एकात्मता, सर्वोत्तमता आणि मूल्यनिर्मितीची मूल्ये ही पुढे जात असताना विविध कार्यांमध्ये सखोलपणे रूजवली जातील.”
राहुल किर्लोस्कर म्हणाले, “ग्राहककें द्री व्यवसायांमध्ये रिअल्टी व्यवसायात अवांते स्पेसेस आणि अर्का फिनकॅप या बिगर बँकिंग फायनान्स कंपनी (एनबीएफसी) मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाईल. अवांते स्पेसेस भूखंडांचा विकास करत असून, स्मार्ट इमारती उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. अर्का फिनकॅपची स्थापना मागील वर्षी किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या मालकीची कंपनी म्हणून करण्यात आली असून तिने १००० कोटी रूपयांच्या बीजभांडवलाद्वारे आपले काम सुरू केले. ती कॉर्पोरेशन्ससाठी रचनात्मक मुदत वित्त उपाययोजनांवर आणि एमएसएमई कर्जदारांना तसेच मालमत्ता बाजारांना कर्जे देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. पुढील तीन वर्षांत अर्का फिनकॅप रिटेल कर्ज आणि ग्राहक वित्ताचा व्यवसाय विकसित करेल.”
“हा विस्तार करताना काही नवीन दिग्गज लोक आमच्याशी जोडले आहेत. त्यामध्ये अर्का फिनकॅपममध्ये विमल भंडारी, रिअल इस्टेट उद्योगासाठी विनेश जयरथ आणि किर्लोस्कर न्यूमॅटिकमध्ये के. श्रीनिवासन यांचा समावेश आहे. उद्योगातील दिग्गज आरव्ही गुमास्ते, संजीव निमकर आणि अविनाश मंजुळ हे किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि किर्लोस्कर चिलर्समध्ये रुजू होत आहेत. पुढील तीन वर्षात अर्का फिनकॅप रिटेल लोन व ग्राहक अर्थपुरवठा करण्यास प्रयत्नशील आहे.”